Published On : Fri, Jun 12th, 2020

एमएसएमई लवकरच स्टॉक एक्स्चेंज सुरु करणार : नितीन गडकरी

Advertisement

महाबीझ’ पदाधिकार्‍यांशी ई संवाद

नागपूर: एमएसएमई ही केंद्र शासकीय संस्था आता लवकरच स्टॉक एक्सचेंज सुरु करणार असून देशातील आणि परदेशातील गुंतवणूकदारांना यात आपला पैसा गुंतवता येईल. तसेच सर्वसामान्य माणूसही एमएसएमईचे शेअर खरेदी करून गुंतवणूक करू शकेल, अशी माहिती केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, परिवहन व एमएसएमई मंत्री नितीन गडकरी यांनी दिली.

‘महाबीझ’च्या पदाधिकार्‍यांशी ते व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संवाद साधत होते. गल्फ महाराष्ट्र बिझिनेस फोरमने हा संवाद कार्यक्रम आयोजित केला होता. विमा आणि शेअर्समध्ये गुंतवणुकीची संधी सध्या असल्याचे सांगताना गडकरी म्हणाले- उच्च प्रगती करणार्‍या एमएसएमई उद्योगांना शासनाकडून रेटिंग मिळेल आणि शासनही 15 टक्के भागभांडवल उपलब्ध करेन. तसेच अ‍ॅमॅझॉनसारखे ‘ई मार्केट प्लेस’ही एमएसएमई तयार करीत आहे. कोरोनामुळे त्याला वेळ लागणार आहे. पण हे संकेतस्थळ सुरु झाल्यानंतर ऑनलाईन व्यवहार लोकांना करता येतील, असेही गडकरी म्हणाले.

आत्मनिर्भर पॅकेजमध्ये 3 लाख कोटी बजेट एमएसएमईला मिळाले. याचा फायदा 45 लाख एमएसएमई उद्योगांना होणार आहे. ‘फंड ऑफ फंड’च्या माध्यमातून 50 हजार कोटींचे ‘इक्विटी इनफ्यूजन’, जे एमएसएमई उद्योग जलद गतीने प्रगती करीत आहेत, त्यांना याचा फायदा होणार आहे. पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणुकीसाठी हा योग्य काळ आहे. सध्या या क्षेत्राची स्थिती चांगली असून मागील 5 वर्षात आपण 17 लाख कोटींची कामे य क्षेत्राला दिली आहे, याकडे लक्ष वेधत गडकरी यांनी अ‍ॅग्रो एमएसएमईच्या संकल्पनेतून ग्रामीण भागात, जंगल क्षेत्रात आणि आदिवासी भागात उद्योग नेऊन या भागाचा विकास करण्याची संकल्पना मांडली. यामुळे तरुणांना रोजगार आणि उद्योगांना जागा व कच्चा माल उपलब्ध होईल. गावाखेड्याची अर्थव्यवस्थाही यामुळे मजबूत होणार आहे, असेही ते म्हणाले.

मुंबई-दिल्ली राष्ट्रीय महामार्गाचे उदाहरण देताना त्यांनी सांगितले की, जंगल क्षेत्र, आदिवासी भागातून या रस्त्याची आखणी आम्ही केली असल्यामुळे भूसंपादनात आमची कोट्यवधीची बचत झाली आहे. याशिवाय रस्त्यांच्या बाजूला विविध उद्योगांचे क्लस्टर, रेल्वे, पोर्ट, बस, पाणी, ऊर्जा, औद्योगिक क्षेत्र, गरीबांसाठी घरे आणि स्मार्ट व्हिलेजचे निर्माण असे प्रकल्प राबविले जाऊ शकतात.

ही जमीन कमी दरात उपलब्ध झाली असल्यामुळे येथे येणारे उद्योग हे सक्षम निर्माण होतील, असे सांगून गडकरी म्हणाले- चीनमधून ज्या वस्तू आपण आयात करीत होतो, त्या वस्तू बनविणारे कौशल्य असलेले कामगार, कारागिर, उच्च तंत्रज्ञान आपल्याकडे असल्यामुळे त्याच वस्तू आपणही आपल्या देशात निर्माण करून निर्यात सुरु केली आहे. उच्च तंत्रज्ञान आणि आंतरराष्ट्रीय दर्जाची उत्पादन निर्मिती यामुळे देशातील उद्योगांना वस्तू निर्यातीची संधी मिळेल. परिणामी अर्थव्यवस्था मजबूत होईल.

परकीय गुंतवणूक व उच्च तंत्रज्ञान या दोन्हीची आज आपल्या देशातील उद्योगाांना आवश्यकता आहे. त्या दृष्टीने आमचे प्रयत्न असून ग्रामीण भागाचा विकास, उच्च तंत्रज्ञान, परकीय गुंतवणूक आणणे, उद्योग गावाखेड्यात नेणे, इथेनॉल इंधन निर्मिती, बायो सीएनजीचा वाहतुकीसाठी उपयोग हे देशाला आत्मनिर्भरतेकडे नेणारे मार्ग असल्याचेही नितीन गडकरी म्हणाले.