Published On : Tue, Sep 21st, 2021

भारतीय इतिहास, संस्कृती, मूल्यांना जगात प्रचंड मान्यता : ना. गडकरी

Advertisement

प्रियदर्शनी अ‍ॅकेडमीचे पुरस्कार वितरण

नागपूर: भारतीय इतिहास, संस्कृती, मूल्ये, परिवार पध्दतीला जगात प्रचंड मान्यता मिळाली आहे. भारतीय संस्कृतीसोबतच खर्‍या अर्थाने अध्यात्म, धर्म याबद्दलचे ज्ञानही जागतिक स्तरावर पोहोचविण्याचे काम श्रध्देय श्री श्री रविशंकर यांनी केले असल्याचे प्रतिपादन केंद्रीय रस्ते, महामार्ग वाहतूक व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी केले.

प्रियदर्शनी अ‍ॅकेडमीच्या पुरस्कार वितरण समारंभात ते बोलत होते. या आभासी कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री पियुष गोयल, श्री श्री रवीशंकर, संस्थेचे नानीक रुपानी, सुरेश प्रभू, निरंजन हिरानंदाणी, डॉ. माशेलकर उपस्थित होते. 37 व्या वर्धापन दिनानिमित्त विविध क्षेत्रातील तसेच देश आणि परदेशातील उल्लेखनीय काम करणार्‍यांचा अ‍ॅकेडमीतर्फे सन्मान करण्यात आला.

https://fb.watch/89n0gVTJy0/

याप्रसंगी बोलताना ना. गडकरी यांनी मुंबई पुणे द्रुतगती महामार्गाचे बांधकामाच्या वेळी अनेक अडचणी असताना नानीक रुपाणी व नाना चुडासामा यांचे बहुमोल सहकार्य मिळाल्याचा उल्लेख यावेळी केला. जागतिक दर्जाचे व विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणार्‍या प्रतिभावंतांना सकारात्मकतेने, गुणात्मकतेने एकत्र आणून समाजाची एकता मजबूत करून या सर्वांना भारतीय विचारधारेशी जोडण्याचे काम या संस्थेच्या माध्यमात नानीक रुपानी करीत असल्याचेही ना. गडकरी म्हणाले.

भारतीय संस्कृती, इतिहास, परंपरा, मूल्ये, समाजपध्दती, अध्यात्म व धर्म जागतिक स्तरावर पोहोचवण्याचे काम श्रीश्री रवीशंकर व रुपानी सारख्या समाजातील मान्यवरांनी केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी योग दिन साजरा केला. याची दखल घेऊन युनोनेही योग दिन साजरा करण्याचा निर्णय घेतला. आज जागतिक स्तरावर आमचा योगदिन साजरा केला जातो. याला आता जगात प्रचंड मान्यता मिळाली आहे. प्रियदर्शनी अ‍ॅकेडमीने केलेले हे सन्मान समजातील अनेकांना प्रेरणादायी ठरतील, असा विश्वासही ना. गडकरी यांनी व्यक्त केला.