Published On : Mon, Feb 12th, 2018

शेतीला पूरक व्यवसायाची जोड द्या – श्रीमती अमृता फडणवीस

Advertisement

नागपूर:- शेतीला पूरक व्यवसाय म्हणूनच पशुपालन व दुग्ध व्यवसायाची जोड दिल्यास आर्थिक व सामाजिक प्रगती शक्य असल्याचे प्रतिपादन ॲक्सिस बँकेच्या उपाध्यक्षा श्रीमती अमृता फडणवीस यांनी केले.

मुख्यमंत्री दत्तक ग्राम फेटरी येथील पशुसवंर्धन विभाग पंचायत समिती, नागपूर व जिल्हा परिषद नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा वार्षिक योजना सन 2017-18 अंतर्गत पशुसंवर्धनासाठी मार्गदर्शक ठरावे म्हणून फेटरी येथे तालुकास्तरीय पशु-पक्षी प्रदर्शनाच्या बक्षिस वितरण कार्यक्रम श्रीमती अमृता फडणवीस यांच्या हस्ते आज करण्यात आले. यावेळी त्या बोलत होत्या. त्यांच्या हस्ते पशु-पक्षी प्रदर्शनामध्ये उत्तम पशुधन असणाऱ्या कृषी बांधवांना रोख रक्कम तसेच प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

श्रीमती फडणवीस म्हणाल्या, आपल्याकडील बहुतांशी शेती ही निसर्गावर अवलंबून आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे अनेकदा शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. यासाठी शेतकरी बांधव आणि नवोदित युवकांनी पशुसंवर्धन व्यवसायाकडे वळावे. या व्यवसायाच्या माध्यमातून स्वयंरोजगार सुरु करुन समाजात सन्मानाचे स्थान मिळवावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

वेस्टन कोल्डफिल्डच्या माध्यमातून तालुक्यातील प्रत्येक शाळेत सॅनिटरी नॅपकिनचे व्हेंडिंग मशीन लावण्यात आले आहे. त्याला ‘पंख प्रोजेक्ट’ नांव देण्यात आले आहे. या ‘पंख प्रोजेक्ट’ चे उद्घाटन श्रीमती फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी डब्ल्युसीएलचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक राजीव रंजन मिश्रा यांना शाल श्रीफळ देवून गौरविण्यात आले. नागपूर जिल्ह्यातील कामठी, हिंगणा, भिवापूर, काटोल, कळमश्वर तालुक्यातील तेरा शाळेत सॅनिटरी नॅपकिनचे व्हेंडिंग मशीन लावण्यात आले आहेत, याचा मुली आणि महिलांना खूप फायदा होत आहे.

फेटरी येथे नासुप्रच्या माध्यमातून मुलांना खेळण्यासाठी विविध खेळण्यांनीयुक्त बगिचा तयार करण्यात आला आहे. या बगिच्याचे उद्घाटन श्रीमती फडणवीस यांनी केले. नागपूर सुधार प्रन्यासच्या वतीने एस.टी.पी. प्लाँटचे भूमिपूजनही यावेळी करण्यात आले. ओला कचरा आणि सुका कचरा यांच्या माध्यमातून ऑरगॅनिक वेस्ट कन्व्हर्टरचे उद्घाटन करुन यावेळी लोकार्पण करण्यात आले.

फेटरी येथील आरोग्य उपकेंद्राचे नुतणीकरण करण्यात आले आहे. या उपकेंद्राचे लोकार्पणही यावेळी करण्यात आले. फेटरी येथील जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापकांच्या कक्षेमध्ये झेल्पमॉक डिझाईन ॲन्ड टेक्नालॉजी प्रायव्हेट लिमिटेडच्या वतीने गावातील शेतकऱ्यांना तांत्रीक सहकार्य करणाऱ्या पायलट प्रोजेक्टचे उद्घाटनही यावेळी करण्यात आले. कृषी प्रायोगिक प्रकल्पावर आधारित ‘शेतकरी मित्र’ ॲपमध्ये 18 मॉडुल्स आहेत. या माध्यमातून शेतकरी आपल्या शेतीविषयक अडचणी नमुद करु शकतील आणि तज्ज्ञांकडे मदत मागू शकतील. तसेच शासनाच्या वतीने शेतकऱ्यांसाठी सुरु करण्यात आलेल्या विविध योजनांची माहिती या ॲपच्या माध्यमातून सहज उपलब्ध होईल तसेच या योजनांसाठी ऑनलाइन अर्ज देखील सादर करता येतील. जिल्हा परिषद शाळेच्या पटांगणात निर्माण करण्यात आलेल्या सुसज्ज व्यायामशाळेचे उद्घाटन करुन लोकार्पण करण्यात आले.

कवडस येथील जिल्हा परिषद डिजिटल शाळेचे लोकार्पण श्रीमती अमृता फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी डिजिटल शाळेत वर्ग पहिली ते सातवी इयत्तेसाठी मनोरंजनातून शिक्षण सुलभ व्हावे यासाठी सुरु करण्यात आलेल्या डिजिटल प्रणालीचे प्रात्यक्षिक करुन दाखविण्यात आले. सोलर इंडस्टीज यांच्या सीएसआर निधीतून शाळेच्या परिसरात विद्यार्थ्यांच्या भोजनासाठी नियोजित भोजनकक्षाचे उद्घाटन व आर.ओ. वॉटर फिल्टर मशीनचे लोकार्पण करण्यात आले. मदर डेअरी दूध संकलन केंद्राला श्रीमती फडणवीस यांनी भेट दिली. तेथील दूध संकलनाच्या कामाची पाहणी केली. यावेळी गावकऱ्यांनी मदर दूध डेअरीमुळे गावातच शुध्द दुधाचा पुरवठा उपलब्ध होत असून येथील ग्रामवासीयांना रोजगार प्राप्त झाल्याबद्दल समाधान व्यक्त केले. झेल्पमॉक डिझाईन ॲन्ड टेक्नालॉजी प्राइव्हेट लिमिटेडच्या वतीने गावातील शेतकऱ्यांना तांत्रीक सहकार्य करणाऱ्या पायलट प्रोजेक्टचे उद्घाटन झाले. यानंतर सिमेंट नाला बांध 16/2 चे भूमिपूजन करण्यात आले. महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राच्या वतीने आयोजित कवडस येथील कृषी व कृषी आधारित उत्पादन, डेअरी, वनऔषधी व अन्न धान्य प्रक्रिया प्रतिष्ठानाला त्यांनी यावेळी भेट दिली.

यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा श्रीमती निशा सावरकर, उपाध्यक्ष शरद डोणेकर, तसेच नागपूर महानगर विकास प्राधिकरणचे आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, विशेष कार्याधिकारी श्रीमती आशा पठाण, गट विकास अधिकारी किरण कोवे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. यु, एस, हिरुडकर, पशुधन विकास अधिकारी डॉ. श्रीमती प्रियंवदा सिरास, डॉ. अमर शंभरकर, सभापती श्रीमती नम्रता राऊत, उपसभापती सुजित नितनवरे, सरपंच श्रीमती मनिषा गावंडे, उपसरपंच अनिरुध्द लांबसोंगे तसेच कवडस आणि फेटरी येथील ग्रामस्थ उपस्थित होते.