मुंबई:अभिनेता गोविंदाला स्वतःच्याच बंदुकीतून गोळी लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मुंबई पोलिसांनी यासंदर्भात माहिती दिली. गोविंदाकडून त्याचा परवानाधारक बंदुकीचा ट्रीगर अनावधानाने दाबला गेला, त्यामुळे बंदुकीतून गोळी सुटली. ती गोविंदाच्या पायाला लागली.
जखमी झालेल्या गोविंदाला जवळच्या क्रिटी केअर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्याच्यावर उपचार सुरू असून तो सुखरूप असल्याची माहिती समोर येत आहे. याप्रकरणी जुहू पोलीस अधिक तपास करत असून गोविंदाची बंदूक ही त्यांनी ताब्यात घेतली आहे.
माहितीनुसार,गोविंदा कोलकात्याला जाण्याच्या तयारीत होता. तो आपली परवाना असलेली बंदुक कपाटात ठेवत असताना त्याच्या हातातून ती पडली आणि एक गोळी त्याच्या पायाला लागली. डॉक्टरांनी गोळी काढली असून त्यांची प्रकृती ठीक आहे. त्याच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहे.