नागपूर :शासकीय पगारासाठी बनावट शालार्थ आयडीचा वापर करून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी नागपूर सायबर पोलिसांनी मोठी कारवाई करत तीन सहाय्यक शिक्षकांना अटक केली आहे. या आरोपींनी तब्बल २५ लाख रुपयांहून अधिक आर्थिक फसवणूक केल्याचे समोर आले आहे.
या प्रकरणी विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाचे कनिष्ठ प्रशासन अधिकारी रविंद्र ज्ञानेश्वर पाटील यांनी सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. अटकेतील आरोपींमध्ये सतीश विजय पवार (३४), राहणार शाहूनगर, मानेवाडा, प्रज्ञा विरेंद्र मुले (३८), राहणार सुर्योदय नगर, म्हालगीनगर आणि भूमिका सोपान नखाते (३९), राहणार सर्वश्री नगर, दिघोरी यांचा समावेश आहे. हे तिघेही सहाय्यक शिक्षक आहेत.
पोलिस तपासात उघडकीस आले की, या आरोपींनी बनावट शालार्थ आयडी तयार करून नियुक्त्या घेतल्या आणि त्यानंतर नियमित पगार घेण्यास सुरुवात केली. सतीश पवारने ऑगस्ट २०२३ पासून तर प्रज्ञा मुले आणि भूमिका नखाते यांनी जून २०२४ पासून शासकीय वेतन स्वीकारण्यास सुरुवात केली होती.
या प्रकरणात आतापर्यंत विभागीय शिक्षण उपसंचालक, शिक्षण अधिकारी, लिपिक, शाळा मुख्याध्यापक, संचालक यांच्यासह १४ जणांना अटक करण्यात आली होती. नव्याने झालेल्या अटकांमुळे आरोपींची एकूण संख्या १७ झाली आहे. नागपूर सायबर पोलिसांचा तपास सुरू असून या घोटाळ्यात आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे.