नागपूर – नागपूर महानगरपालिकेने सलग दुसऱ्या दिवशी अनुपस्थित असलेल्या ९२ सफाई कामगारांवर कारवाई केली आहे. मंगळवारी (१७ जून) अतिरिक्त आयुक्त वसुमना पंत यांनी शहरातील विविध झोनमध्ये अचानक भेट देत सफाई कामगारांच्या उपस्थितीची तपासणी केली. तपासणीदरम्यान गांधीबाग झोनमधील वॉर्ड क्रमांक १९ च्या चिटणीस पार्क स्टँडवर ८२ कर्मचारी आणि लक्ष्मीनगर झोनमधील वॉर्ड क्रमांक ३६ मध्ये १० कर्मचारी अनुपस्थित आढळले.
अधिकार्यांनी सांगितले की, हे सर्व कर्मचारी कोणतीही पूर्वसूचना न देता अनुपस्थित होते. यावर अतिरिक्त आयुक्त पंत यांनी संबंधित झोन अधिकाऱ्यांना प्रत्येकी ५,००० रुपयांचा दंड आकारण्याचे आदेश दिले. तसेच गैरहजर ९२ सफाई कामगारांवर प्रत्येकी १,००० रुपयांचा दंड लावण्यात येणार असून त्यांचा अर्धा दिवसाचा पगारही कपात केला जाणार आहे.
मान्सूनपूर्व स्वच्छता मोहिमेचा भाग
मनपा प्रशासन सध्या पावसाळ्यापूर्वी शहरात स्वच्छतेचे काम जलद गतीने सुरू करत आहे. याच पार्श्वभूमीवर पंत यांनी झोननिहाय भेटी देऊन कामगारांच्या उपस्थितीची पाहणी केली. या दौऱ्यात त्यांनी स्पष्ट निर्देश दिले की, भविष्यात कोणताही कर्मचारी पूर्वसूचना न देता गैरहजर राहिल्यास त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल.
१२ जणांनी सुट्टीसाठी अर्ज केला –
तपासणीदरम्यान १२ कामगारांनी सुटीसाठी अर्ज केला असल्याचे समोर आले आहे. यासंदर्भात पंत यांनी अधिकार्यांना या सुट्या अधिकृतपणे मंजूर झाल्या होत्या की नाही याची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. उपायुक्त राजेश भगत यांनी यासंबंधी सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.