नागपूर : शहरातील गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा पथकाने मध्यरात्री कारवाई करत नंदनवन परिसरातून एका आरोपीला अग्निशस्त्र आणि जिवंत काडतूसासह ताब्यात घेतलं आहे. या प्रकरणी नंदनवन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई 11 नोव्हेंबर रोजी रात्री 00.10 वाजेपासून पहाटे 1.55 वाजेदरम्यान नंदनवन हद्दीतील जे.एल. चतुर्वेदी कॉलेजच्या मागील भागात करण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चैतन्य उर्फ चिंटू रामकृष्ण डांगरे (वय 35, रा. घर क्र. 1444, न्यू नंदनवन लेआउट, नागपूर) या आरोपीच्या घरावर छापा टाकण्यात आला. या कारवाईत पोलिसांना एक मॅगझिनसह अग्निशस्त्र (किंमत ₹50,000), एक जिवंत काडतूस (₹1,000) आणि मोबाईल फोन (₹10,000) असा एकूण ₹61,000 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी पोलीस ठाणे नंदनवन, अप. क्र. 570/25, कलम 3/25 आर्म्स अॅक्ट सह 135 बीपी अॅक्टप्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला आहे. आरोपीची वैद्यकीय तपासणी करून त्याला पुढील कारवाईसाठी नंदनवन पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले.
ही कारवाई गुन्हे शाखा, सामाजिक सुरक्षा विभागाचे पोलीस निरीक्षक राहुल शिरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पथकात एपीआय नन्नावरे, महिला हेड कॉन्स्टेबल आरती, एनपीसी सेसरा राऊत, पीसी अश्विन मांगे, समीर शेख, नितीन वसने आणि कुणाल बोधखे यांचा समावेश होता.











