मुंबई – महाराष्ट्राला नवे राज्यपाल लाभले असून आचार्य देवव्रत यांनी आज राजभवनात झालेल्या भव्य समारंभात शपथ घेतली. विशेष म्हणजे, त्यांनी ही शपथ संस्कृत भाषेत घेतली. या प्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते.
सीपी राधाकृष्णन यांची उपराष्ट्रपतीपदी निवड झाल्याने राज्यपाल पद रिक्त झाले होते. आता ही जबाबदारी आचार्य देवव्रत यांच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे.
आचार्य देवव्रत हे शिक्षणतज्ज्ञ, समाजसेवक आणि वैदिक परंपरेचे जाणकार विद्वान म्हणून परिचित आहेत. गुरुकुल कुरुक्षेत्र येथे प्राचार्य म्हणून त्यांनी उल्लेखनीय कार्य केले आहे. शिक्षण क्षेत्रातील योगदानामुळे त्यांचा गौरवही झाला.
२०१५ मध्ये त्यांची हिमाचल प्रदेशचे राज्यपाल म्हणून नियुक्ती झाली आणि याच काळापासून त्यांचा प्रशासकीय प्रवास सुरू झाला. त्यानंतर २०१९ मध्ये त्यांना गुजरातचे राज्यपाल म्हणून नेमण्यात आले. सध्या तेथील जबाबदाऱ्या पार पाडत असतानाच आता त्यांच्याकडे महाराष्ट्राचे राज्यपालपद सोपवण्यात आले आहे.