
नागपूर : सीताबर्डी परिसरातील एका महिलेचे बंदुकीच्या धाकावर अपहरण करून कारमध्ये बलात्कार केल्याच्या आरोपांमधून अखेर आरोपीची निर्दोष सुटका झाली आहे. जिल्हा आणि सत्र न्यायालयाने सबळ पुराव्यांअभावी हा निकाल दिला.
नानक लालताप्रसाद यादव असे निर्दोष सुटलेल्या आरोपीचे नाव आहे. या खटल्याची सुनावणी न्यायमूर्ती श्रीमती एस. पी. पोंक्षे यांच्या न्यायालयात झाली.
तक्रारीनुसार, २०१७ साली पीडिता आपल्या मुलीला डबा देण्यासाठी इटर्निटी मॉलमध्ये गेली होती. मॉलमधून बाहेर पडत असताना एका इसमाने कारने तिचा पाठलाग केला. त्याने बंदुकीच्या धाकावर तिचे अपहरण केले आणि अज्ञातस्थळी नेऊन कारमध्ये बलात्कार केला. एवढेच नव्हे, तर त्या घटनेची व्हिडिओ चित्रफीत बनवून पीडितेला समाजात बदनाम करण्याची व जीवे मारण्याची धमकीही दिली. या प्रकरणी कपिलनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सरकारी पक्षाने या खटल्यात तक्रारदार, तिची मुलगी, मुलगा, पंच साक्षीदार आणि तपास अधिकाऱ्यांच्या साक्षी नोंदवल्या. मात्र, साक्षीपुरावे अपुरे आणि विसंगत आढळल्याने न्यायालयाने आरोपीला निर्दोष घोषित केले.
आरोपीच्या वतीने ॲड. मंगेश डी. राऊत यांनी प्रभावीपणे बाजू मांडली, तर त्यांना ॲड. नाझीया पठाण यांनी सहकार्य केले. सर्व पुरावे आणि युक्तिवाद विचारात घेत न्यायालयाने “सबळ पुराव्यांअभावी आरोपी निर्दोष” असा निर्णय दिला.









