Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!
  | | Contact: 8407908145 |
  Published On : Tue, Sep 22nd, 2020

  परिस्थितीचा स्वीकार करा; मन शांत राहिल

  ‘कोव्हिड संवाद’ : प्रसिद्ध आध्यात्मिक मानसोपचारतज्ज्ञ डॉ.प्रबोध यांचा मोलाचा सल्ला

  नागपूर : आजची कोव्हिडची स्थिती ही अनेकांना भयावह वाटत आहे. मात्र याला आपली मन:स्थितीही जबाबदार आहे. जेव्हा आपली मन:स्थिती आपल्याला आतमध्ये खात असते तेव्‍ही आपण भीती बाळगत असतो आणि भीतीमुळे विश्वास कमी कमी होतो. लहानपणी वाचलेल्या कथेत जसे सश्याच्या पाठीवर झाडाचे पान पडते आणि तो आभाळ पडले म्हणून सांगत फिरतो, तशी भीती आहे. भीतीमुळे मन अशांत राहते. आपण जोपर्यंत परिस्थितीपासून दूर पळू किंवा त्याकडे दूर्लक्ष करू तेवढी आपल्याला जास्त भीती वाटेल आणि त्यामुळे मन अशांत राहिल. म्हणून परिस्थितीचा स्वीकार करा, त्यामुळे भीती कमी होईल, मन शांत राहिल, असा मोलाचा सल्ला शहरातील प्रसिद्ध आध्यात्मिक मानसोपचारतज्ज्ञ तथा इन्स्टिट्यूट ऑफ सायको मॅनेजमेंट स्टडीजचे संचालक डॉ. प्रबोध यांनी दिला.

  महापौर संदीप जोशी यांच्या संकल्पनेतून नागपूर महानगरपालिका आणि इंडियन मेडिकल असोशिएनशच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘कोव्हिड संवाद’ या फेसबुक लाईव्ह कार्यक्रमात मंगळवारी (ता.२२) ते बोलत होते. यावेळी नागरिकांकडून विचारण्यात आलेले प्रश्न आणि त्यांच्या शंका या सर्वांना त्यांनी समर्पक उत्तरे देत मार्गदर्शन केले.

  ते म्हणाले, या काळात मानसिक संतुलन टिकवून ठेवणे अत्यावश्यक आहे. आज सर्वत्र मास्क लावा म्हणून सांगितले जात आहे. मास्क लावणे म्हणजे चेहरा लपविणे नव्हे, ते बंधन नसून आवश्यक गोष्ट आहे, हे ध्यानात ठेवावे. आपण दररोज शरीर स्वच्छतेसाठी ब्रश करतो, आंघोळ करतो. मात्र मनाच्या स्वच्छतेसाठी हवे ते करत नाही. मन शुद्धीसाठी प्राणायाम करा. यासाठी वेगळ्या आसनांची गरज नाही. स्वत:शी सकारात्मक बोलणे हे सुद्धा प्राणायामच आहे. स्वत:वर विश्वास ठेवा. जगात अनेक लोक अस्वस्थ आहेत. जो ‘स्व’वर स्थापित आहे तो ‘स्वस्थ’ हा मंत्र लक्षात ठेवा, असेही डॉ. प्रबोध यांनी सांगितले.

  मागील किमान ६ महिन्यांपासून लोक घरात कोंडली गेली त्यामुळे त्याचे अनेक परिणाम दिसून येत आहे. अनेकांमध्ये चिडचिड वाढली, नैराश्य आले, अस्थितरतेची भावना निर्माण झाली, अशा अनेक नकारात्मकतेने मनात भीती निर्माण केली आहे. यामधून बाहेर निघण्यासाठी कोणत्याही औषधाची गरज नाही. यासाठी काही गोष्टी कटाक्षाने करा. स्वत:शी नेहमी सकारात्मक बोलत राहा. आपले परिसर स्वच्छ ठेवा. परिसर स्वच्छ होत असतानाच आपल्या मनाचीही स्वच्छता होते. स्वच्छतेतून शांती मिळते, समाधान मिळते त्यातून मन:शांती लाभते. याशिवाय कुटूंबासोबत सौहार्दपूर्ण वातावरण ठेवा. आजच्या अनिश्चिततेच्या वाटेत प्रेम हाच उपाय आहे. त्याची इतरांकडून अपेक्षा करण्यापेक्षा ते तुमच्या वागण्या, बोलण्यातून इतरांना द्या. घरात प्रेमाचे वातावरण निर्माण करा, असेही आवाहन डॉ. प्रबोध यांनी केले.

  कोरोनाचा अहवाल येईपर्यंत सर्व व्यवस्थित होते, मात्र अहवाल पॉझिटिव्ह आल्यापासून गळ्यात दुखायला लागले, या प्रश्नावर उत्तर देताना ते म्हणाले, आपल्या विचारात खूप मोठी शक्ती आहे. त्याचा परिणाम आपल्या शरीरावर होतो. मनात भावना येतात आणि त्याचबरोबर शरीरात संवेदना ही पोहोचतात. कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह येणे म्हणजे विषाणूने शरीरात प्रवेश करणे एवढाच त्याचा अर्थ आहे. आपण मनाच्या माध्यमातून शरीराला भीतीचा पुरवठा करीत असतो. त्यामुळे मनला सशक्त, सजग करण्यासह आपली प्रतिकारशक्ती अधिक बळकट करण्याची गरज आहे. प्रतिकारशक्ती बळकट करण्यासाठी आपण घेत असलेला प्रत्येक श्वास सतेज आणि सशक्त करणे आवश्यक आहे. ते करण्यासाठी सकारात्मक विचार करा, सकाळी उठल्यापासून सकारात्मकता ठेवा. आपण श्वास घेतो म्हणजे बाहेरची शुद्ध हवा आत घेतो. बाहेरची शुद्ध हवा म्हणजे प्राणवायू हे आपल्या शरीरातील प्राणशक्ती पुष्ठ करते. ही पुष्ठ प्राणशक्ती आपली प्रतिकारशक्ती बळकट करते. त्यामुळे सकारात्मक राहा. ही काळजी करण्याची वेळ नसून काळजी घेण्याची वेळ आहे, असेही डॉ. प्रबोध म्हणाले.

  कोरोनामुळे पुढील विश्व बदलणार आहे. आपली जीवनशैली बदलणार आहे. आधी आपण हस्तांदोलन करायचो, आलिंगन द्यायचो. हे आता टाळावे लागणार आहे. आपले प्रेम आपल्या शब्दांमधून व्यक्त करा. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आपल्या तोंड आणि नाकावर मास्क घाला, तो भावनांवर घालू नका. एकमेकांना आधार द्या. कोरोनाबाधित रुग्ण हा अपराधी नाही, तो पिडीत आहे. त्याच्याकडे पिडीत म्हणून पाहा, तुमच्या मनातून सांत्वना निघतील. आजची परिस्थिती हरविण्यासाठी आपल्या प्रत्येकालाच काळजी घ्यायची आहे. एकमेकांपासून शारीरिक अंतर राखत एकत्रपणे लढा द्यायचा आहे. त्यामुळे स्वत:वर विश्वास ठेवा आणि इतरांनाही विश्वासाची साथ द्या, असे आवाहनही प्रसिद्ध आध्यात्मिक मानसोपचारतज्ज्ञ डॉ. प्रबोध यांनी केले.


  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145