Published On : Mon, Oct 12th, 2026
By Nagpur Today Nagpur News

पेपरफुटी रोखणार, बेरोजगार पदवीधरांना ५ हजारांचा भत्ता; अभिजित वंजारींचा सहा वर्षांचा रोडमॅप

Advertisement

पेपरफुटी रोखणार, बेरोजगार पदवीधरांना ५ हजारांचा भत्ता; अभिजित वंजारींचा सहा वर्षांचा रोडमॅप

नागपूर : पेपरफुटीला आळा घालणे, बेरोजगार पदवीधरांना दरमहा पाच हजार रुपये भत्ता मिळवून देणे आणि स्थानिक युवकांसाठी रोजगाराच्या संधी वाढवणे, या प्रमुख मुद्द्यांवर काँग्रेसचे अभिजित वंजारी यांनी पुढील सहा वर्षांचा रोडमॅप जाहीर केला. विदर्भात उद्योगांची उभारणी, स्पर्धा परीक्षांमध्ये पारदर्शकता आणि विद्यार्थ्यांसाठी आधुनिक कौशल्य प्रशिक्षणावर भर देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

वंजारी यांनी ‘मिशन जॉब’ आणि रोजगार मेळाव्यांच्या माध्यमातून युवकांना रोजगार मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवण्याची ग्वाही दिली. आतापर्यंत आठ हजार विद्यार्थ्यांना रोजगार मिळवून देण्यासाठी काम केल्याचा दावा त्यांनी केला. तसेच पुढील सहा वर्षांत ३६ मार्गदर्शन मेळावे आयोजित करण्याचा मानस व्यक्त केला. स्पर्धा परीक्षांमधील कथित पेपरफुटी प्रकरणांची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली.

बेरोजगार पदवीधरांना दरमहा पाच हजार रुपये भत्ता देण्याबरोबरच उद्योगांमध्ये किमान ५० टक्के स्थानिक युवकांना रोजगार मिळावा, अशी त्यांची भूमिका आहे. डॉ. श्रीकांत जिचकर यांच्या नावाने पदवीधर भवन उभारणे, विदर्भातील सहा जिल्ह्यांत पदवीधरांसाठी केंद्रे निर्माण करणे आणि महाज्योतीअंतर्गत सर्व ३६ जिल्ह्यांत अद्ययावत वसतिगृहे उभारण्याची मागणीही त्यांनी केली.

महाराष्ट्रात स्पर्धा परीक्षांसाठी एकदाच नोंदणी शुल्क आकारण्याची योजना लागू करावी, तसेच ओबीसी विद्यार्थ्यांना अधिक संधी मिळाव्यात, यासाठी प्रयत्न करणार असल्याचे वंजारी यांनी स्पष्ट केले. सरकारने जाहीर केलेल्या ७५ हजार नोकऱ्यांच्या कार्यक्रमाची पूर्ण अंमलबजावणी झाली नसल्याचा आरोपही त्यांनी केला.

Advertisement

पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत प्रत्यक्ष काम आणि मतदारांचे प्रश्न हेच प्रमुख मुद्दे असतील, असा दावा करत वंजारी यांनी सुमारे २५ हजार मतांच्या फरकाने विजय मिळवण्याचा विश्वास व्यक्त केला. कराळे यांच्या बंडखोरीबाबत महाविकास आघाडीच्या बैठकीनंतर निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी सांगितले.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.