नागपूर : शहरातील शांतिनगर परिसरात अत्यंत धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका २० वर्षीय युवतीवर तिच्या वडिलांच्या मित्राच्या मुलाने जबरदस्ती बलात्कार केल्याचे समोर आले आहे. आरोपीने बाथरूममध्ये आंघोळ करत असतानाच युवतीचे फोटो काढले आणि ते सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत तिच्यावर अनेक महिन्यांपर्यंत अत्याचार केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीचे नाव मयूर येवले (वय ३२, रा. प्रेमनगर) असे आहे. त्याचे आई-वडील दोघेही आता हयात नाहीत. त्याचे वडील आणि पीडितेचे वडील हे जुन्या ओळखीचे मित्र होते. काही महिन्यांपूर्वी मयूर एका अपघातात जखमी झाल्याने तो उपचारासाठी पीडितेच्या घरीच राहत होता.
याच दरम्यान, त्याने कपटाने युवतीच्या बाथरूममधून आंघोळ करतानाचे फोटो काढले आणि ते सोशल मीडियावर टाकण्याची धमकी देऊन १८ जुलै २०२४ पासून १ नोव्हेंबर २०२५ या काळात तिच्यावर वारंवार अत्याचार केला. एवढेच नव्हे, तर पीडितेने ही बाब कोणालाही सांगितल्यास तिच्या आई-वडिलांना आणि बहिणीला ठार मारण्याची धमकीही दिली होती.
सततच्या धमक्या आणि मानसिक छळामुळे त्रस्त झालेल्या पीडितेने अखेर धैर्य एकवटून शांतिनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत मयूर येवले याला अटक केली असून त्याच्याविरोधात बलात्कार आणि आयटी कायद्याच्या विविध कलमांनुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.










