नेवासा : राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच पेटला आहे. समाजबांधवांच्या वतीने ठिकठिकाणी आंदोलन करण्यात येत आहेत. यातच एका तरुणाने प्रवरासंगम येथे पुलावरून गोदावरी नदीपात्रात उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे.
मिस यू आई… जय व पप्पा, मी मराठा आरक्षणासाठी जीव देत आहे. समाजासाठी एक जीव माझापण. जय आईसोबत कायम राहा.माझा मम्मीमध्ये खूप जीव आहे. यापुढे कायम चांगले जगा, असा आईच्या व्हॉट्सअॅपवर मेसेज करीत ओम याने आपले जीवन संपविले. मंगळवारी रात्री साडेआठच्या सुमारास ही घटना घडली.
महेश ऊर्फ ओम मोहन मोरे (वय २०, रा. बजाजनगर, छत्रपती संभाजीनगर), असे त्या तरुणाचे नाव आहे. छत्रपती संभाजीनगर येथील बजाजनगर येथे एका खासगी कंपनीमध्ये ओमचे वडील चालक आहेत. वडील, आई, लहान भाऊ यांच्यासह ओम मोरे हा बजाजनगर येथे वास्तव्यास होता.
दरम्यान ओमने प्रवरासंगम येथील पुलावरून गोदावरी नदीपात्रात उडी मारली. रात्री आईने मेसेज पाहिल्यानंतर ओमचा शोध सुरू झाला. दरम्यान, त्याच्या मोबाइलचे शेवटचे लोकेशन येथील गोदावरी पुलाजवळ मिळाले, तपास केला असता, ओमची दुचाकी प्रवरासंगम गोदावरी पुलावर मिळून आली. मंगळवारी रात्री नऊपासूनच नेवासा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक धनंजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू झाला. रात्री उशिरापर्यंत शोध न लागल्याने बुधवारी सकाळी आलेल्या छत्रपती संभाजीनगर येथील पथकाने रेस्क्यू मोहीम राबविली. दुपारी दीडच्या सुमारास ओमचा मृतदेह बाहेर काढला. त्यानंतर नेवासा येथील ग्रामीण रुग्णालयात मृतदेह शवविच्छेदन करून नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला आहे.