नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या वतीने केंद्र शासनाच्या ‘हर घर तिरंगा’ आणि ‘हर घर स्वच्छता: स्वतंत्रता का उत्सव स्वच्छता के संग अभियानांतर्गत मनपाच्या झोन १०, प्रभाग ९ मधील सदर छावणी परिसरात टाकाऊ वस्तूंपासून आकर्षक कलाकृती साकारण्यात आली आहे. या कलाकृतीचे मनपाच्या अतिरिक्त आयुक्त श्रीमती वसुमना पंत यांनी अवलोकन केले.
याप्रसंगी सहायक आयुक्त श्री. अशोक गराटे यांच्यासह श्री भूषण गजभिये आयईसी चमूचे श्री. अविनाश दामडे, श्री.पीयूष खांडेकर, श्री. सन्नी नक्के आणि कु. श्रेय जानी आदी उपस्थित होते.
मनपाच्या अतिरिक्त आयुक्त श्रीमती वसुमना पंत यांनी कलाकृतीचे निरीक्षण केले आणि ‘हर घर तिरंगा’चा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचवला. अशा प्रकारच्या उपक्रमांमुळे लोकांमध्ये देशभक्ती, स्वच्छता आणि सामाजिक एकतेबद्दल जागरूकता वाढते, तसेच सामुदायिक सहभागाला प्रोत्साहन मिळते, असे सांगितले.
या उपक्रमात ‘वेस्ट ऑफ वंडर’ अर्थात टाकाऊ वस्तूंपासून कलाकृती या संकल्पनेला मूर्त रूप देण्यात आले. परिसरातील एका भिंतीवर आकर्षक आणि प्रेरणादायी चित्रकला तयार करण्यात आली. या चित्रकलेच्या माध्यमातून पर्यावरण संरक्षण आणि वस्तूंचा पुनर्वापर करण्याचा संदेश देण्यात आला. यातील सर्वात लक्षवेधी बाब म्हणजे, २,५०० प्लास्टिकच्या बाटल्यांच्या झाकणांचा (कॅप्स) वापर करून सैनिकांची एक सुंदर प्रतिमा साकारण्यात आली.