मुंबई – राज्यात पहिलीपासून तिसरी भाषा शिकणं अनिवार्य असल्याच्या निर्णयावर अनेकांनी चिंता व्यक्त केली होती की, यामुळे हिंदी लादली जाईल. मात्र, शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी यासंदर्भात स्पष्ट भूमिका मांडत सांगितलं की, विद्यार्थ्यांना तिसऱ्या भाषेची निवड करण्याचे पूर्ण स्वातंत्र्य असेल.
दादा भुसे यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं की, “पहिली ते पाचवी इयत्तेतील विद्यार्थ्यांना तिसरी भाषा त्यांच्या आवडीनुसार निवडता येईल. कोणतीही भाषा जबरदस्तीने लादली जाणार नाही.” तसेच, अशा निर्णयासाठी राज्य सरकारने स्पष्ट मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत.
त्यांनी स्पष्ट केलं की, सर्व शाळांमध्ये मराठी शिकवणं बंधनकारक आहे – मग त्या इंग्रजी माध्यमाच्या असोत की अन्य. पाचवीपासून हिंदी विषय अनेक शाळांमध्ये आधीपासून शिकवला जातो. परंतु तिसऱ्या भाषेच्या निवडीबाबत आता विद्यार्थ्यांना पर्याय दिला जातोय.
जर किमान २० विद्यार्थ्यांनी एखाद्या वेगळ्या भाषेची मागणी केली, तर ती भाषा शिकवण्यासाठी शिक्षक उपलब्ध करून दिले जातील, असंही त्यांनी सांगितलं. तसेच, त्या भाषेच्या अध्यापनासाठी लागणाऱ्या अन्य सुविधा उभारल्या जातील.
दादा भुसे म्हणाले की, “महाराष्ट्र हे त्रिभाषा सूत्र प्रत्यक्षात अंमलात आणणारे पहिले राज्य ठरणार आहे. इतर राज्यांमध्ये केवळ चर्चा होते, पण महाराष्ट्रात आम्ही प्रत्यक्ष अंमलबजावणी करत आहोत.” त्यांनी हेही स्पष्ट केलं की, इंग्रजी आणि मराठीशिवाय तिसरी भाषा शिकवण्याचा निर्णय विद्यार्थ्यांवर सोडण्यात आला आहे.
“विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढावी, त्यांच्या संधी वाढाव्यात, यासाठीच त्रिभाषा सूत्र अवलंबतो आहोत. लहान वयात शिकण्याची क्षमता अधिक असते, हे शास्त्र सांगतं. त्यामुळे तिसऱ्या भाषेचा अभ्यास लवकर सुरू केला, तर त्याचा फायदा होईल,” असं मत त्यांनी मांडलं.
तसेच, मराठी शिकवणं सक्तीचं असल्याचं त्यांनी पुन्हा एकदा अधोरेखित केलं. “मराठी शिकवलं न गेल्यास संबंधित शाळांची मान्यता रद्द केली जाईल. महाराजांचा इतिहास, ‘गरजा महाराष्ट्र माझा’ यासारखी मूल्यवर्धक अध्ययन सामुग्री शिकवली जाईल,अशी माहिती त्यांनी दिली.
दादा भुसे यांनी आश्वासन दिलं की, हिंदीव्यतिरिक्त इतर भारतीय भाषांची मागणी झाली, तरी आम्ही त्या शिकवण्यासाठी तयार आहोत. विद्यार्थ्यांच्या आणि पालकांच्या गरजा लक्षात घेऊन निर्णय घेतला जाईल. शिक्षणाचे माध्यम विस्तृत व्हावे, आणि महाराष्ट्रातील विद्यार्थी मेरीटमध्ये पुढे यावेत, हाच आमचा हेतू आहे.