
नागपूर : मोबाईलवर कार्टून दाखवण्याचे आमिष दाखवून दहा वर्षांच्या चिमुरडीशी अश्लील वर्तन केल्याची धक्कादायक घटना नंदनवन परिसरात उघडकीस आली आहे. या प्रकरणात मुलीच्याच नात्यातील ४० वर्षीय मौसावर आरोप करण्यात आला आहे. पीडित मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीनंतर नंदनवन पोलिसांनी आरोपीविरुद्ध पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, घटनेच्या दिवशी मुलगी आरोपीकडे गेली होती. यावेळी त्याने मोबाईलवर कार्टून दाखवण्याच्या बहाण्याने तिला जवळ बोलावले. त्यानंतर मुलीशी अश्लील संवाद साधत तिच्यासोबत गैरवर्तन केल्याचा आरोप आहे.
घडलेल्या प्रकारामुळे घाबरलेल्या मुलीने घरी परतल्यानंतर आईला संपूर्ण घटना सांगितली. मुलीच्या आईने तातडीने नंदनवन पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. या तक्रारीची दखल घेत पोलिसांनी ४० वर्षीय आरोपीविरुद्ध पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवला आहे. प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून, या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली.



