Published On : Tue, Jan 2nd, 2018

चंद्रपूरमधील वीज उपकेंद्रात भीषण आग, ट्रान्सफॉर्मरमध्ये २ मोठे स्फोट

Advertisement

चंद्रपूर: चंद्रपूर येथील वरोरा २२० केव्ही वीज उपकेंद्राला काल (सोमवार) रात्री भीषण आग लागली. या आगीदरम्यान ट्रान्सफॉर्मरमध्ये २ भीषण स्फोट झाले आणि त्यामुळे संपूर्ण परिसर हादरला. दरम्यान, ही आग नेमकी कशामुळे लागली याबाबत कोणतीही माहिती अद्याप समजू शकलेली नाही.

या घटनेनंतर अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालं आणि आग विझवण्याचे प्रयत्न सुरु झाले. ही आग मुख्य उपकेंद्रापर्यंत पोहचू नये ही काळजी घेत, वीज कर्मचाऱ्यांनी वीजपुरवठा त्वरित खंडीत केला. यामुळे आणखी मोठी दुर्घटना टळली.

पहाटे ही आग विझवण्यात अग्निशमन दलाला यश आलं आहे. मात्र, ट्रान्सफॉर्मर जळाल्यानं ३५ गावांचा वीजपुरवठा खंडीत झाला आहे. तर महापारेषणचं लाखोंचं नुकसान झाल्याचं कळतं आहे.

दरम्यान, खंडीत झालेला वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी अजूनही 24 तास लागण्याची शक्यता आहे. सध्या वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरु आहे.