
नागपूर : पश्चिम नागपूर विधानसभा क्षेत्रात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात आणि सामाजिक बांधिलकी जपत साजरी करण्यात आली. गिट्टीखदान चौक येथे युवा नेते शुभम सिद्धार्थ घरडे यांच्या पुढाकारातून भव्य भोजनदान आणि महारॅलीचे आयोजन करण्यात आले.
जयंतीनिमित्त संपूर्ण परिसर निळ्या पताकांनी सजून ‘भीममय’ झाला होता. आकर्षक रोषणाई, डीजेच्या तालावर थिरकणारे नागरिक आणि उत्साहाने ओसंडून वाहणारा जनसागर यामुळे वातावरणात जल्लोष आणि अभिमानाची भावना दिसून येत होती.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी करुणाताई घरडे व शुभम घरडे होते. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. उपस्थितांना मार्गदर्शन करताना सामाजिक एकात्मता आणि शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. त्यानंतर आयोजित भोजनदानात सुमारे पाच हजार नागरिकांनी सहभागी होत लाभ घेतला.
याचवेळी अलीकडेच घडलेल्या अथर्व नानोरे हत्याकांडाचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. त्यांच्या प्रतिमेसमोर मेणबत्त्या प्रज्वलित करून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. तसेच या प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा, फाशीची शिक्षा देण्याची मागणी शासन व न्यायव्यवस्थेकडे करण्यात आली. सोशल मीडियाच्या माध्यमातूनही अथर्वच्या कुटुंबाला न्याय मिळावा, अशी जोरदार मागणी करण्यात आली.
या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली. भैय्याजी चोबे, नितीन माहुरे, रुची कारोन्डे, युनिस खान, बशीर खान, नयनभाई, शैलेश शेवाळे, आसिफ खान, सोनू शेंडे, पुरंदर यादव, शैलेश पांडे, सचिन पाली तसेच घरडे मित्र परिवार यांचा प्रमुख सहभाग होता.








