Published On : Wed, Sep 2nd, 2020

नदीकाठच्या गावांच्या पुनर्वसनाबाबत लवकरच बैठक घेवून निर्णय करणार

-मदत व पुर्नवसनमंत्री विजय वडेट्टीवार

नागपूर : पूर्व विदर्भातील अनेक जिल्हयात नदीकाठच्या गावामध्ये पूरग्रस्तांची घरे वाहून गेली आहेत.त्यांचे पुर्नवसन होणे आवश्यक आहे. याबाबत लवकरच बैठक घेवून निर्णय करणार असे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी आश्वस्त केले.

Gold Rate
18 Oct 2025
Gold 24 KT ₹ 1,28,500 /-
Gold 22 KT ₹ 1,19,500 /-
Silver/Kg ₹ 1,70,500/-
Platinum ₹ 60,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

कन्हान, पेंच या नदीच्या परिसरात येणाऱ्या पुरामुळे अनेक गावे पूरग्रस्त झाली आहेत. यापैकी अनेक गावांच्या नागरिकांची पुनर्वसनासाठी तयारी असून याबाबत पुर्नवसन मंत्र्यांनी पुढाकार घेण्याची विनंती खासदार कृपाल तुमाने यांनी केली होती.

पूर्व विदर्भात आलेल्या पूर परिस्थितीमुळे झालेल्या नुकसान व मदतीबाबत विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये पूर्व विदर्भातील पूरग्रस्त जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांची बैठक वडेट्टीवार यांनी घेतली. या बैठकीमध्ये खासदार कृपाल तुमाने यांनी पुनर्वसनासंदर्भात मुद्दा मांडला.

नदीकाठच्या गावांमधील पुनर्वसनासंदर्भात वेगळी बैठक घेण्यात येईल, असे आश्वासन यावेळी मदत व पुनर्वसन मंत्री वडेट्टीवार यांनी दिले. सोबतच अनेक गावांमध्ये पुनर्वसन करताना काही प्रमाणात लोकांची अनुमती असते तर त्याच गावातील काही नागरिक अनुमती देत नाही. त्यामुळे गुंता वाढतो. अशा परिस्थितीत ज्या गावांनी पुर्णपणे पुनर्वसन करण्याची मागणी केली आहे. त्याच गावाच्या पुनर्वसनाबाबतचा निर्णय तातडीने घेता येईल, अशी शक्यता वडेट्टीवार यांनी व्यक्त केली.

यावेळी पारशिवनी व मौदा तालुक्यातील काही गावांनी शंभर टक्के पुनर्वसन करण्यात यावे, अशी तयारी दर्शवली आहे. त्यामुळे या संदर्भात तातडीने निर्णय घ्यावा,अशी मागणी यावेळी तुमाने यांनी केली .

पारशिवनी, मौदा व कुही तालुक्यातील दौऱ्यानंतर या परिसरातील नागरिकांना जीवनावश्यक धान्य पुरवठा करण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली. नागरिकांना सध्या या अचानक आलेल्या पुरातून सुरक्षित स्थळी हलविणे, महामारी पसरणार नाही यासाठी प्राथमिक आरोग्य सुविधा उपलब्ध करणे,तसेच शुद्ध पिण्याचे पाणी पोहोचविणे, आवश्यक असल्याचेही त्यांनी लक्षात आणून दिले. शेती व छोटया व्यवसायाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. नागरिकांनी वेळीच जागा सोडल्याने जीवित हानी टळली आहे, अशी परिस्थिती वारंवार पुढे येऊ शकते. त्यामुळे ज्या गावांना पुराचा संभावित धोका आहे. अशा सर्व गावांचे पुनर्वसन करण्यासाठी बृहत् आराखडा तयार करण्याची मागणी देखील त्यांनी केली आहे. यासाठी एक वेगळी बैठक लावून हा प्रश्न सोडविण्यात येईल, असे निर्देश यावेळी वडेट्टीवार यांनी दिले.

Advertisement
Advertisement