Published On : Wed, Nov 21st, 2018

अपूर्व विज्ञान मेळावा २८ नोव्हेंबरपासून महापौरांनी घेतली आढावा बैठक

नागपूर : नागपूर महानगरपालिका व असोसिएशन फॉर रिसर्च ॲण्ड ट्रेनिंग इन बेसिक सायन्स एज्युकेशन यांच्या संयुक्त विद्यमाने २८ नोव्हेंबर ते २ डिसेंबरदरम्यान ‘अपूर्व विज्ञान मेळाव्याचे’ आयोजन करण्यात आले आहे. अपूर्व विज्ञान मेळाव्याचे हे २१ वे वर्ष आहे. विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक दृष्टीकोनाला चालना देणाऱ्या या विज्ञान मेळाव्याच्या आयोजनांसदर्भात मंगळवारी (ता. २०) महापौर नंदा जिचकार यांच्या अध्यक्षतेत आढावा बैठक आयोजित करण्यात आली.

महानगरपालिकेच्या डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभागृहात आयोजित बैठकीमध्ये महापौर नंदा जिचकार यांच्यासह शिक्षण समिती सभापती दिलीप दिवे, क्रीडा समिती सभापती नागेश सहारे, कर संकलन समितीचे उपसभापती सुनील अग्रवाल, नगरसेविका रूपा रॉय, उज्ज्वला शर्मा, नगरसेवक सुनील हिरणवार, अपर आयुक्त राम जोशी, शिक्षणाधिकारी संध्या मेडपल्लीवार, परिवहन व्यवस्थापक शिवाजी जगताप, असोसिएशन फॉर रिसर्च ॲण्ड ट्रेनिंग इन बेसिक सायन्स एज्युकेशनचे सचिव सुरेश अग्रवाल, सहायक शिक्षणाधिकारी कुसुम चापले, अपूर्व विज्ञान मेळाव्याचे समन्वयक राजेंद्र पुसेकर, क्रीडा अधिकारी नरेश सवाईतूल, क्रीडा निरीक्षक नरेश चौधरी आदी उपस्थित होते.

उत्तर अंबाझरी मार्गावरील रामदासपेठ येथील राष्ट्रभाषा भवन येथे इयत्ता सहावी ते बारावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी पाच दिवसीय अपूर्व विज्ञान मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे. ‘आओ करे विज्ञान से दोस्ती’ या संकल्पनेवर आधारीत ह्या मेळाव्याचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाविषयी रुची निर्माण करणे हा आहे. विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक संकल्पना रुजविणारा तसेच त्यांना हसत खेळत विज्ञान शिकविणारा अपूर्व विज्ञान मेळावा आहे. विद्यार्थ्यांनी स्वत:च बघावे, समजून घ्यावे, शिकावे व स्वत: करून पाहावे, या उद्देशाने या विज्ञान मेळाव्याचे आयोजन करण्यात येते. या प्रदर्शनाला भेट देणाऱ्या विद्यार्थ्यांची कोणत्याही प्रकारे गैरसोय होऊ नये, यासाठी काळजी घ्या. तसेच संपूर्ण प्रदर्शन परिसरात नेहमी स्वच्छता राखली जावी, याकडे लक्ष देण्यात यावे, असे निर्देश यावेळी महापौर नंदा जिचकार यांनी दिले.

रसायनशास्त्र, जीवशास्त्र, भौतिकशास्त्र, गणित विषयांवर १०० प्रयोग
असोसिएशन फॉर रिसर्च ॲण्ड ट्रेनिंग इन बेसिक सायन्स एज्युकेशन संस्थेतर्फे विद्यार्थ्यांना आनंददायी विज्ञान प्रयोग शिकविण्याच्या उद्देशाने विविध प्रयोग तयार केले जातात. अपूर्व विज्ञान मेळाव्यामध्ये इयत्ता सहावी ते बारावीतील अभ्यासक्रमातील रसायनशास्त्र, जीवशास्त्र, भौतिकशास्त्र, गणित या विषयांतील १०० प्रयोग असतील. नागपूर महानगरपालिकेच्या शाळांतील २०० विद्यार्थी प्रदर्शनाला भेट देणाऱ्यांना या प्रयोगांबाबत माहिती देतील. विशेष म्हणजे या अपूर्व विज्ञान मेळाव्याला शहरातील सर्व शासकीय व खासगी शाळांमधील विद्यार्थी भेट देतात.