
नागपूर : पारशिवनी तालुक्यातील कन्हान पोलीस ठाण्याच्या हद्दीत कोळसा चोरी करणाऱ्यांविरुद्ध मोठी मोहीम राबवण्यात आली. या कारवाईत पोलिसांनी लाखो रुपयांचा कोळसा जप्त करत तब्बल २४ कोळसा चोरांना आरोपी ठरवले आहे.
ठाणेदार जयंती मांडवधरे यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवारी पहाटे ४ ते ६ वाजेदरम्यान ही कारवाई करण्यात आली. पोलिसांनी कोळसा वाहतुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या १४ दुचाकी आणि १० सायकलींसह हजारो किलो कोळसा जप्त केला आहे.
दरम्यान, पोलिस तपासात उघड झाले की हे चोर एकीकृत इंदर-कामठी डीप ओपन कास्ट खाणी परिसरातून कोळसा चोरून मौदा तालुक्यातील लीहगाव येथे असलेल्या कोळसा टाळांवर पोहोचवत होते.
या संदर्भात लीहगावच्या सरपंच अस्मिता खांडेकर यांनी पोलिस प्रशासनाकडे लेखी तक्रार दाखल केली होती. त्यानंतर कन्हान पोलिसांनी तातडीने ही मोहीम हाती घेत मोठ्या प्रमाणात कोळसा चोरीचे जाळे उघडकीस आणले.
स्थानिक पातळीवर या कारवाईचे स्वागत होत असून कोळसा चोरी रोखण्यासाठी पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.










