Published On : Fri, Aug 24th, 2018

ऑस्ट्रेलियन शिष्टमंडळाने घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

Advertisement

मुंबई: महाराष्ट्रात परदेशी गुंतवणुकीसाठी अमाप संधी आहेत. 50 टक्के परदेशी गुंतवणूक ही महाराष्ट्रात येणार आहे. ऑस्ट्रेलिया- महाराष्ट्रातील पर्यटन आणि व्यापार वाढीसाठी खंडित झालेली ऑस्ट्रेलियातील ब्रिस्बेन ते मुंबई विमानसेवा पुन्हा सुरू करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सूतोवाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

ऑस्ट्रेलियाच्या भारतातील उच्चायुक्त श्रीमती हरिंदर सिद्धू यांच्या शिष्टमंडळाने आज वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांची भेट घेतली;त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. या भेटीदरम्यान ऑस्ट्रेलियाचे महावाणिज्यदूत टोनी ह्यूबर, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव भूषण गगराणी, राजशिष्टाचार विभागाचे उपसचिव सतीश जोंधळे आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री म्हणाले, गुंतवणुकीसाठी महाराष्ट्रात चांगले वातावरण असून पायाभूत सोयी-सुविधाही आहेत. राज्यात काही ठिकाणी पर्जन्यछायेखालील क्षेत्र आहे, यावर जलसंधारणाच्या माध्यमातून काम सुरू आहे. या क्षेत्रात ऑस्ट्रेलियाच्या गुंतवणूकदारांना काम करण्यास खूप संधी आहेत. गोदावरी नदी खोऱ्याचे काम हे ऑस्ट्रेलियाबरोबर झालेल्या सामंजस्य करारातून होत आहे. मराठवाड्यात वॉटर ग्रीडच्या माध्यमातून पाणी टंचाई दूर करण्याचे काम शासनाने हाती घेतले आहे. महाराष्ट्रात 50 टक्के धरणांचे काम सुरू आहे, यात ऑस्ट्रेलियाने योगदान द्यावे.

शिवाय राज्यात स्मार्ट सिटी विकसित करण्याची कामेही सुरू असून नागरिकांना आवास योजनेतून घरे देण्याचे काम सुरू आहे. मुंबईमधील वाहतूक व्यवस्था सुरळीत व्हावी यासाठी मेट्रो, ट्रान्स हार्बर लिंक आणि नवी मुंबई विमानतळाचे कामही प्रगतीपथावर असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

यावेळी श्रीमती सिद्धू यांनी माहिती तंत्रज्ञान, जलसंधारण, स्वच्छता आणि विविध पायाभूत सुविधा यामध्ये गुंतवणूक करण्याची इच्छा व्यक्त केली. महाराष्ट्र आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये खूप जिव्हाळ्याचे संबंध आहेत, पर्यटन वाढीसाठी प्रयत्न व्हावेत, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली. यावेळी उद्योग, अर्थव्यवस्था, क्रीडा आदी विषयांवर चर्चा झाली.