Published On : Sat, Mar 3rd, 2018

राजस्थानी समाजाच्या समस्या सोडविण्यासाठी कटिबद्ध – मुख्यमंत्री

Advertisement

ठाणे: वर्षा निवासस्थान माझे नसून सर्व जनतेचे आहे, आपल्या कोणत्याही समस्या असल्यास कधीही येऊ शकता, त्या सोडविण्यासाठी मी कटिबद्ध आहे असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

भाईंदर पूर्व येथील बाळासाहेब ठाकरे मैदानात राजस्थानी होळी महासंमेलनात मुख्यमंत्री बोलत होते. सुमारे १०-१२ हजार लोकांची उपस्थिती असलेल्या राजस्थानी होळी संमेलनात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीने चैतन्य पसरले. मुख्यमंत्रीदेखील मोकळेपणाने प्रेक्षकांत मिसळले आणि त्यांनी अनेकांशी हस्तांदोलन केले, शुभेच्छा दिल्या. टाळ्यांच्या कडकडाटात मुख्यमंत्र्यांना राजस्थानी फेटाही बांधण्यात आला.

आपल्या भाषणात होळीच्या शुभेच्छा देऊन मुख्यमंत्री म्हणाले की पर्यावरणपूरक होळी खेळून झाडांचा ,लाकडाचा विनाश पण टाळला पाहिजे. आपल्या सर्वांच्या जीवनात सुखाचे खूप रंग येवोत आणि वाईट प्रवृत्तीचा नाश होवो अशी सदिच्छाहि त्यांनी व्यक्त केली.

राजस्थानी समाजाला भाईंदर येथे भवनासाठी जागा पाहिजे आहे याचा उल्लेख करून मुख्यमंत्री म्हणाले की अशी जागा आमदार नरेंद्र मेहता यांनी सुचवावी ,ती निश्चितपणे देण्यात येईल.

आमदार नरेंद्र मेहता यांचेही याप्रसंगी भाषण झाले.