नागपुर – मागील तीस वर्षापासून प्रलंबित असलेल्या यशवंत स्टेडियम (पटवर्धन मैदान) वरील ‘डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जन्मशताब्दी स्मारक’ बनवण्याचा प्रस्ताव 31 डिसेंबर 1992 रोजी एकमताने मनपाने पास केला होता, त्याला 29 वर्ष उलटून गेल्यावरही ती जागा महाराष्ट्र शासनाने अजूनपर्यंत मनपाच्या स्वाधीन केलेली नाही. परिणामः त्यावर काहीही काम झालेले नाही. त्यामुळे ती जागा विनाविलंब मनपाच्या स्वाधीन करून त्यावर ‘आंबेडकर शोध केंद्र’ बांधावे अशी मागणी आज प्रदेश बसपाचे सचिव उत्तम शेवडे व मनपा पक्षनेते जितेंद्र घोडेस्वार यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने महाराष्ट्राचे ऊर्जामंत्री व नागपूरचे पालकमंत्री नितीन राऊत यांना केली.
आज बहुजन समाज पार्टीचे प्रदेश कार्यालय सचिव उत्तम शेवडे, मनपा पक्षनेते जितेंद्र घोडेस्वार, आशीनगर झोनच्या सभापती वंदना राजू चांदेकर, नगरसेवक मोहम्मद इब्राहिम तोफिक, वैशाली अविनाश नारनवरे, मंगला योगेश लांजेवार, वीरंका भिवगडे, ममता महेश सहारे, नरेंद्र वालदे, नितीन शिंगाडे, योगेश लांजेवार, विलास सोमकुवर, आदींच्या शिष्टमंडळाने पालकमंत्र्यांच्या कार्यालयात त्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन स्मारकाविषयी सविस्तर चर्चा केली.
स्मारकाविषयी भूमिका मांडताना नगरसेवक व बसपा नेत्यांनी मागील 29 वर्षापासून भाजपा-सेना, काँग्रेस-राका आदी आंबेडकर विरोधी पक्षाच्या सत्ता असल्यामुळेच हा प्रश्न निकाली काढण्यात आलेला नसल्याची टीका बसपा नेत्यांनी करुन आपल्याकडून अपेक्षा असल्याचेही पालकमंत्र्याना सांगितले.
बसपाने 1993 पासून या स्मारकाच्या विषयावर धरणे, निदर्शने, मोर्चा, आंदोलने केलेली आहेत. 2016 ला तर संविधान चौकात चक्काजाम आंदोलनही केले होते. परंतु शासन- प्रशासनाच्या मनुवादी व अडेलतट्टू भूमिकेमुळे हे स्मारक बनू शकले नाही. एवढेच काय तर त्यासाठी शासनाने ही जागा मनपाच्या स्वाधीन सुद्धा केलेली नाही.
‘नागपूर महानगरपालिका दर वर्षीच्या बजेटमध्ये मागील 29 वर्षापासून स्मारका करिता दोन कोटीची तरतूद करीत असते’ परंतु लिज नूतनीकरणासाठी महाराष्ट्र शासनाने मागितलेली 5 लाख 71 हजार रुपयाची पेनल्टी भरण्यास तयार नाही, किव्हा सरकार ती पेनल्टी माफ करण्यास तयार नाही. त्यामुळे हा प्रश्न आजपर्यंत प्रलंबित ठेवल्या गेला होता.
भाजप व कॉंग्रेस चे बडे नेते या ठिकाणी आंबेडकर स्मारक बनू नये यासाठी वेगवेगळे फंडे वापरीत असल्याचाही आरोप यावेळी बसपा नेत्यांनी केला. यातूनच भटाचे स्मारक उभे राहिले हे विशेष. *केंद्रीय मंत्री नितिन गडकरी व राज्यमंत्री नितीन राऊत यांच्यात झालेल्या गुप्त बैठकी नुसार* यशवंत स्टेडियम पाडून त्या जागेवर बीओटी तत्वावर भव्य व्यापारी संकुल बांधण्यात येणार असून त्यात आंबेडकर जन्मशताब्दी स्मारक सुद्धा राहणार असल्याचा खुलासा पालकमंत्र्यांनी केला. परंतु या कामास कधी सुरुवात होईल, किती दिवस लागतील, याची ब्लूप्रिंट कुठे आहे? हे सांगण्यास मात्र त्यांनी टाळाटाळ केली.
नागपुरातील दोन्ही नितीन च्या मिलीभगत मुळे ह्या स्मारकाचे काम तर रखडले नाही ना? अशी शंका बसपाने त्यांनी यावेळी व्यक्त केली? येत्या 15 दिवसात स्मारका विषयी कुठलाच योग्य निर्णय जर झाला नाही तर बसपा दोन्ही ‘मंत्रीद्वय नितीन (गडकरी- राऊत)’ व मनपा च्या विरोधात जनआंदोलन उभारेल असा इशारा बसपा पक्षनेते नगरसेवक जितेंद्र घोडेस्वार व बसपाचे प्रदेश नेते उत्तम शेवडे यांनी दिला आहे.









