नागपूर : राज्यभर १ ते १५ जानेवारी २०२५ या कालावधीत उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्यावतीने ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ उपक्रम राबविण्यात येणार आहे. या पंधरवाड्या दरम्यान येथील सिव्हिल लाइन परिसरातील शासकीय विभागीय ग्रंथालयात ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती, शासकीय विभागीय ग्रंथालयाचे ग्रंथपाल रामदास साठे यांनी दिली आहे.
उच्च व तंत्र शिक्षण विभागाने २० डिसेंबर २०२४ रोजी शासन निर्णय निर्गमित करुन या विभागाच्या अधिपत्याखालील राज्यातील विद्यापीठे, महाविद्यालये, सार्वजनिक ग्रंथालयांमध्ये वाचन संकल्प महाराष्ट्राचा हा अभिनव उपक्रम राबविण्याचे जाहीर केले आहे. या उपक्रमांतर्गत सामुहिक वाचन, वाचन कौशल्य, कार्यशाळा, वाचन संवाद, साहित्यिकांच्या मुलाखती, चर्चा, पुस्तक परिक्षण व कथन स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे. तसेच ग्रंथप्रदर्शनाचे आयोजन करुन अधिकाधिक विद्यार्थ्यांचा सहभाग व सभासद नोंदणी करण्यात येणार आहे. उपक्रमाच्या अंमलबजावणीसाठी राज्य, विभाग व जिल्हास्तरीय समित्यांची रचना करण्यात आली आहे.
या उपक्रमाचा भाग म्हणून शासकीय विभागीय ग्रंथालयात १ ते १५ जानेवारी २०२५ दरम्यान ग्रंथप्रदर्शनाचे आयोजन करण्यात येणार असून नागरिक, वाचक, सभासद, विद्यार्थी, अभ्यासक यांनी मोठ्या संख्येने या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन ग्रंथपाल रामदास साठे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.