नागपूर : मंगळवारी सकाळी कोराडी तलावाजवळील सर्व्हिस रोडवर विचित्र अपघात घडल्याची घटना समोर आली आहे.एका हायस्पीड मिक्सर वाहनाने कारला धडक दिली. ज्यामुळे कार नियंत्रणाबाहेर गेली आणि मुख्य रस्त्यावर आडवी आली.
या घटनेनंतर परिस्थिती आणखी बिकट झाली जेव्हा एसटी महामंडळ बसने अचानक ब्रेक लावला. त्यामुळे मागून येणाऱ्या दुसऱ्या बसने तिला धडक दिली.
मंगळवारी सकाळी ११:३० च्या सुमारास ही घटना घडली. या अपघातात काही प्रवाशी जखमी झाले. जखमी प्रवाशांना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे. सुदैवाने, बस चालकाने वेळीच परिस्थिती लक्षात घेतली आणि ब्रेक लावले, त्यामुळे मोठा अपघात टळला.
या अपघातामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. कोराडी पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून अपघातग्रस्त वाहन बाजूला केले आणि वाहतूक पूर्ववत केली.