नागपूर : शहरातील प्रतापनगरमध्ये मिनी ट्रकने ७ वर्षीय चिमुकलीला चिरडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या भीषण अपघातात चिमुकलीचा मृत्यू झाला. नागपुरातील प्रताप नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गोपाळ नगर ते पडोळे चौक या रस्त्यावर मंगळवारी सायंकाळी हा अपघात घडला. पृथा आकांत पांडे( पन्नासे लेआउट, गोपाल नगर )असे मृत महिलेचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पृथा संध्याकाळी 5.30 च्या सुमारास एका डान्स क्लासमध्ये सहभागी होण्यासाठी जात होती.
ती तिच्या आजोबांच्या दुचाकीवरून जात होती. ते परिसरातून जात असताना मागून येणाऱ्या अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने आजोबांचा तोल गेला. ते रस्त्यावर पडले आणि समांतर दिशेने जाणाऱ्या मिनी ट्रकच्या मागच्या चाकाखाली पृथा आली.
तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि तिला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, जिथे तिचा मृत्यू झाला. प्रतापनगर पोलिसांनी अज्ञात वाहनाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून आरोपीचा शोध सुरू केला आहे.