
नागपूर : वर्धा रोडवरील पंचतारांकित ले मेरिडियन हॉटेलमध्ये काम करणाऱ्या तरुण कर्मचाऱ्याचा गरम पाण्याने भाजल्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना बेलतरोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली.
मृत युवकाचे नाव सचिन शिवाजी जाधव (१९) असे असून तो यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस तालुक्यातील हिवरा गावचा रहिवासी होता. जाधव हॉटेलच्या हाऊसकीपिंग विभागात काम करत होता.
मिळालेल्या माहितीनुसार, २९ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी सुमारे सातच्या सुमारास सचिन साफसफाईचे काम करत असताना अचानक गरम पाणी त्याच्यावर पडले. यात तो गंभीर भाजला गेला. सहकाऱ्यांनी तातडीने त्याला ऑरेंज सिटी हॉस्पिटलमध्ये दाखल केले.
काही दिवस उपचार सुरू असतानाही दुखापतींवर मात करता न आल्यानं मंगळवारी त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी मृताच्या वडिलांनी तक्रार दिल्यानंतर बेलतरोडी पोलिसांनी नोंद घेत पुढील तपास सुरू केला आहे.









