आज न्यायालयात करणार हजर
नागपूर। बाभूळगाव जहांगीर येथील नवोदय विद्यालयातल्या तब्बल 49 विद्यार्थिनींचा लैंगिक छळ करणार्या दोन्ही शिक्षकांना शुक्रवारी रात्री साडेबाराच्या दरम्यान अटक करण्यात आली. अकोला पोलिसांनी नागपूरमध्ये या शिक्षकांना बेड्या ठोकल्या. त्यांना आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
अकोला येथील जवाहर नवोदय विद्यालयामध्ये कार्यरत असलेले शिक्षक राजन बी. गजभिये आणि शैलेश एस. रामटेके यांनी विद्यालयातील नववी ते बारावीमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थिनींचा लैंगिक छळ चालविला होता. एका विद्यार्थिनीने तक्रारीचे धाडस केल्यानंतर इतरही 49 विद्यार्थिनींनी तिच्या पाठीशी राहून पोलिसांत तक्रार करण्याचा निर्णय घेतला. पोलिसांनी दोन्ही शिक्षकांविरुद्ध कलम 354 अ आणि पॉस्को अँक्टच्या कलम 7, 8 नुसार गुन्हा दाखल केला होता. तथापि, गुन्हा दाखल होण्यापूर्वीच 31 मार्च रोजी दोन्ही शिक्षक विद्यालयातून फरार झाले होते. त्यामुळे 1 एप्रिल रोजी गुन्हा दाखल होताच पोलिसांनी दोन्ही शिक्षकांचा शोध सुरू केला होता. 2 एप्रिल रोजी सिव्हिल लाइन्स पोलिसांनी दोन पथके त्यांच्या शोधासाठी नागपूर व गोंदियाकडे रवाना झाली होती. शुक्रवारी रात्री 12:30 वाजताच्या सुमारास नागपूर येथून अटक केली. या शिक्षकांना घेऊन पोलीस अकोल्याकडे निघाले असून, शनिवारी त्यांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.