Published On : Fri, Aug 23rd, 2019

धर्मा पाटील यांच्या विधवा पत्नीला नजरकैदेत ठेवता ; सरकारला सत्तेची एवढी मस्ती कशासाठी – अजित पवार

परभणी : गंगाखेड दि. २३ ऑगस्ट – शेतकरी धर्मा पाटील यांनी मंत्रालयात आत्महत्या केली होती. त्यांच्या विधवा पत्नी मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेच्या ठिकाणी आंदोलन करतील म्हणून नजरकैदेत ठेवले जाते. हा सरकारचा कारभार? …सत्तेची एवढी मस्ती…एवढा माज…कशासाठी असा संतप्त सवाल विधीमंडळ पक्षनेते अजितदादा पवार यांनी गंगाखेड येथील जाहीर सभेत सरकारला केला आणि सत्ता येते – जाते हेही लक्षात घ्या असा निर्वाणीचा इशाराही सरकारला दिला.

राज्यातील शिक्षकांनी आज आपले अवयव विकायला काढले आहेत हे काय चाललंय राज्यात असा सवाल करतानाच अशा घटनांची जबाबदारी कुणाची आहे. ही सरकारची जबाबदारी नाही का? असे सरकारला ठणकावून विचारले.या दळभद्री सरकारमुळे लोक महाराष्ट्रात जीव देवू लागले आहेत असं का करत आहेत याचा विचार सरकार करताना दिसत नाही असेही अजितदादा पवार म्हणाले. या सरकारने सर्वाधिक अन्याय मराठवाडयावर केला आहे त्याचा विचार मराठवाड्यातील जनतेने करावा असे आवाहनही अजितदादा पवार यांनी यावेळी केले.

Gold Rate
18 Oct 2025
Gold 24 KT ₹ 1,28,500 /-
Gold 22 KT ₹ 1,19,500 /-
Silver/Kg ₹ 1,70,500/-
Platinum ₹ 60,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

अंमली पदार्थाचे सेवन महाराष्ट्रात वाढले आहे हे कशाचे द्योतक आहे तर वाढलेली बेरोजगारी आहे. डान्सबार बंदी आमच्या आबांनी केली होती परंतु या सरकारने हे डान्सबार पुन्हा सुरु केले. युवा पिढी बर्बाद करण्याचे काम केले जात आहे. मध्यंतरी या सरकारने घरपोच दारु देण्याचा निर्णय घेतला होता प्या आणि जा चंद्रावर अशी भावना सरकारची होती असेही अजितदादा पवार म्हणाले. रात्र वै-याची आहे. आम्ही सत्तेसाठी हपापलेलो नाही. परंतु सरकारचे जे काही चालले आहे. ते जनतेसमोर आणण्याची आमची जबाबदारी आहे असेही अजितदादा पवार यांनी सांगितले.

सरकारविरोधी बोलणार्‍यांवर ईडीचे लिंबू फिरवले जातेय – धनंजय मुंडे
सरकार विरोधी कोण बोलेल त्याच्याविरोधात ‘ईडी’ चे लिंबू फिरवले जात असल्याचा उपरोधिक टोला विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी गंगाखेडच्या जाहीर सभेत सत्ताधाऱ्यांना लगावला.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीत सरकारविरोधात लाव रे तो व्हिडिओ असा जोरदार हल्लाबोल केला होता म्हणूनच त्यांना ईडीची नोटीस बजावली होती असेही धनंजय मुंडे म्हणाले.

राज्यातील शेतकऱ्यांना ना कर्जमाफी, ना दुष्काळ अनुदान… आणि पीक विमा भरुनही शेतकऱ्यांना अनुदान मिळत नाहीय असा आरोपही धनंजय मुंडे यांनी केला.

युपीएच्या सरकारच्या काळात कधी नीच राजकारण केले गेले नाही.परंतु सध्याचे सरकार नीचतेची पातळी गाठत आहे असेही धनंजय मुंडे म्हणाले.

शब्दाला जागणारा एकमेव नेता म्हणजे अजितदादा पवार आहेत. कोर्टाबद्दल आम्हाला आदर आहे परंतु काही नाही तरीसुद्धा अजितदादा पवार यांच्यावर नजर ठेवली जातेय.

मी पाच वर्षांत या सरकारला उघडं पाडलं आहे.२२ मंत्र्यांचे पुराव्यानिशी भ्रष्टाचार बाहेर काढले आहेत मात्र त्यांना मुख्यमंत्र्यांनी क्लीनचीट दिली.परंतु या भ्रष्टाचाराचे खरेखोटे करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी एका व्यासपीठावर यावे असे जाहीर आव्हान धनंजय मुंडे यांनी दिले.

माझ्यासारखे असंख्य पुरोगामी विचारांचे कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आहेत तोपर्यंत या मातीतील राष्ट्रवादी कुणीही संपवू शकत नाही अशी स्पष्ट भूमिका धनंजय मुंडे यांनी मांडली.

खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी गंगाखेडच्या जाहीर सभेत धर्मा पाटील यांच्या विधवा पत्नींना नजरकैदेत ठेवल्याचा मुद्दा उपस्थित करून लोकांची छळवणूक करणार्‍या सरकारला पायउतार करुन शिवस्वराज्य आणण्याचे आवाहन केले.याशिवाय डॉ. अमोल कोल्हे यांनी सरकारच्या विविध भ्रष्ट योजनांचा समाचार घेतला.या सभेत आमदार मधुसुदन केंद्रे यांनी आपले विचार मांडले. शिवस्वराज्य यात्रेचा पाचवा दिवस असून दुसरी सभा गंगाखेड येथे पार पडली.

या सभेला राष्ट्रवादी काँग्रेसचे विधीमंडळ पक्षनेते अजितदादा पवार, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, खासदार डॉ.अमोल कोल्हे, आमदार मधुसुदन केंद्रे, आमदार विक्रम काळे, आमदार सतिश चव्हाण, आमदार बाबाजानी दुर्राणी आदींसह गंगाखेड विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Advertisement
Advertisement