नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या वतीने नागपुरातील मानकापूर स्टेडियम येथे २३ आणि २४ ऑगस्ट रोजी होऊ घातलेल्या ‘इनोव्हेशन पर्व’च्या निमित्ताने महापौर नंदा जिचकार यांनी निरीमधील शास्त्रज्ञांशी मंगळवारी (ता. २०) चर्चा केली.
यावेळी महापौर नंदा जिचकार यांच्यासह मेयर इनोव्हेशन कौन्सिलचे समन्वयक प्राचार्य डॉ. प्रशांत कडू, निरी चे संचालक डॉ. राकेश कुमार, डॉ. नितीन लाभसेटवार, डॉ. पवन लाभसेटवार, डॉ. कपले, डॉ. के.व्ही. जॉर्ज, डॉ. लक्ष्मीकांतम, अभियंता अंकित गुप्ता, सुव्हा लामा यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
महापौर नंदा जिचकार यांनी ‘इनोव्हेशन पर्व’ संदर्भात निरीतील शास्त्रज्ञांना सविस्तर माहिती दिली. इनोव्हेशन पर्व हे नागपुरातील युवा संशोधकांना व्यासपीठ देणारे आणि त्यांच्या संकल्पनांना बळ देणारे आहे. यात सहभागी होणाऱ्या युवा संशोधकांना निरीतील शास्त्रज्ञांचे मार्गदर्शन मोलाचे ठरणार आहे. इनोव्हेशन पर्वमध्ये येणाऱ्या संकल्पनांचा उपयोग नागपूर शहराच्या शाश्वत विकासात करण्याचा प्रयत्न करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. यापुढेही निरीने अशा उपक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन महापौर नंदा जिचकार यांनी यावेळी केले. वातावरणातील बदल आणि पाणीसंवर्धन या विषयांवरही महापौरांनी चर्चा केली.
याप्रसंगी निरीचे संचालक डॉ. राकेश कुमार यांनी मनपा आणि महापौर इनोव्हेशन कौन्सिलच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांत सहभागी होण्याची तयारी दर्शविली. महापौर इनोव्हेशन कौन्सिलच्या युवा संशोधकांना निरीच्या विविध उपक्रमांमध्ये सहभागी करण्यात येईल, असे निरीचे संचालक डॉ. राकेश कुमार यांनी सांगितले.