नागपूर: पर्यावरण संवर्धनासाठी राज्यात महत्त्वाकांक्षी 33 कोटी वृक्ष लागवड कार्यक्रम राबविण्यात येत असून या मोहिमेमध्ये लावण्यात येणाऱ्या प्रत्येक वृक्षाचे संगोपन व संवर्धन होईल. तसेच ही मोहीम अत्यंत पारदर्शकपणे राबविण्याच्या दृष्टीने संकेतस्थळावर वृक्षारोपणासंबंधी छायाचित्र व व्हिडिओसह अपलोड करण्याच्या सूचना वन विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे यांनी दिल्यात.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बचत भवन सभागृहात जिल्ह्यातील 33 कोटी वृक्षारोपण मोहिमेचा आढावा प्रधान सचिवांनी घेतला. त्याप्रसंगी विभाग प्रमुखांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
यावेळी जिल्हाधिकारी अश्विन मुदगल, मुख्य कार्यपालन अधिकारी संजय यादव, वन विभागाचे मुख्य वनसंरक्षक टी. कल्याणकुमार, विभागीय वनसंरक्षक प्रभुदयाल शुक्ला, उपायुक्त के. एन. के. राव आदी यावेळी उपस्थित होते.
33 कोटी वृक्षारोपण मोहिमेंतर्गत नागपूर जिल्ह्याला 99 लाख 39 हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले असून त्यापैकी वन विभाग व इतर सर्व विभाग मिळून 40 लाख 40 हजार 913 म्हणजे 40.65 टक्के वृक्ष लागवड पूर्ण झाली असून वृक्ष लागवड मोहिमेमध्ये 54 हजार 109 लोकांचा सक्रिय सहभग मिळाला आहे. वृक्ष लागवड मोहीम यशस्वी करण्यासाठी सर्व विभाग प्रमुखांनी दिलेले उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या सूचना करताना प्रधान सचिव विकास खारगे म्हणाले की, या मोहिमेमध्ये लावण्यात येणाऱ्या वृक्षारोपणासंबंधी अक्षांश व रेखांश या माहितीसह वृक्षारोपणासंबंधी संपूर्ण माहिती, फोटो व व्हिडिओ ऑनलाईन दररोज सादर करणे आवश्यक आहे. विभाग प्रमुखांनी वृक्षारोपणाची ऑनलाईन माहिती दररोज प्रत्यक्ष आढावा घेवून सादर करावी, असे निर्देशही यावेळी त्यांनी दिले.
?
वृक्षारोपण मोहीम संपल्यानंतरही लावलेल्या प्रत्येक झाडासंबंधी व त्याच्या संगोपनासंदर्भातील माहिती ऑनलाईन उपलब्ध व्हावी, यादृष्टीने वर्षातून दोनदा फोटो व व्हिडिओ ऑनलाईन सादर करण्याची जबाबदारी सुद्धा विभागांची आहे. या मोहिमेत लावण्यात येणारे प्रत्येक वृक्षाचे संगोपन करणे ही विभागांची जबाबदारी असल्याचे सांगताना श्री. खारगे म्हणाले की, उद्दिष्ट पूर्ण करताना कार्यालय परिसरात तसेच जागा उपलब्ध नसल्यास आपल्या कार्यालयाशी संबंधित असलेल्या संस्था व व्यक्तीद्वारेही वृक्षारोपण करावे. या संदर्भातील माहिती सुद्धा ऑनलाईन उपलब्ध करुन द्यावी, असे निर्देशही यावेळी देण्यात आले.
नागपूर जिल्ह्यात वन विभागातर्फे 48 लाख 43 हजार 275 वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट असून इतर विभागांना 50 लाख 96 हजार 300 वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग, जलसंपदा, सामाजिक वनीकरण, कृषी विभाग, महसूल विभाग, आरोग्य विभाग, पोलिस विभाग आदी विभागांनी वृक्षारोपण मोहिमेत सहभागी झाल्याबद्दल मोहिमेपूर्वीच केलेले खड्डे व त्यानंतर प्रत्यक्ष झालेले वृक्षारोपण यासंदर्भात माहिती सादर केली. वृक्षारोपण मोहीम ऑनलाईन असल्यामुळे विभाग प्रमुखांना प्रत्यक्ष अपलोड केलेल्या माहिती व छायाचित्रासंदर्भात दररोज आढावा घेण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी बैठकीत दिल्या.
नागपूर विभागाने 33 कोटी वृक्षारोपण मोहिमेंतर्गत 3 कोटी 65 लाख वृक्ष लागवडीचे वन विभागाला तर 2 कोटी 43 लाख 71 हजार वृक्ष लागवडी उद्दिष्ट इतर सर्व विभागांना देण्यात आले आहे. त्यापैकी वन व इतर विभागांची 2 कोटी 37 लाख 9 हजार वृक्ष लागवड पूर्ण झाली आहे. वृक्षारोपण मोहीम यशस्वी करण्यासाठी विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी जिल्हाधिकारी, मुख्य कार्यपालन अधिकारी यांना सूचना दिल्या आहेत. विभागाला दिलेले उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी नियोजन केले आहे.
वृक्षारोपण मोहिमेसाठी रोपांची उपलब्धता तसेच रानमाळ पॅटर्न, कन्या वन समृद्धी योजना, रोहयो अंतर्गत वृक्ष शेती, भाऊसाहेब फुंडकर योजनेंतर्गत फळझाड लागवड, तुती लागवड, नदीच्या काठावर वृक्ष लागवड आदी उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करुन वृक्ष लागवडीचे नियोजन करावे, असेही यावेळी बैठकीत सांगण्यात आले.
प्रारंभी जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी स्वागत करुन नागपूर जिल्ह्यातील 33 कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमांच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीसंदर्भात माहिती दिली.