Published On : Tue, Jun 25th, 2019

‘आपली बस’च्या ताफ्यात ‘मिनी बस’चे पदार्पण

Advertisement

आमदार कृष्णा खोपडे यांच्या हस्ते सहा बसचे लोकार्पण

नागपूर: नागपुरातील वस्त्यांमध्ये ‘आपली बस’ पोहचावी आणि प्रवाशांचा प्रवास सुखकर व्हावा, या हेतूने नागपूर महानगरपालिकेच्या परिवहन विभागाच्या वतीने ‘आपली बस’च्या ताफ्यात मिनी बस दाखल करण्यात आली. सहा मिनी बसचे लोकार्पण मंगळवारी (ता. २६) आमदार कृष्णा खोपडे यांच्या हस्ते करण्यात आले.

Gold Rate
04Oct 2025
Gold 24 KT ₹ 1,20,500 /-
Gold 22 KT ₹ 1,12,100 /-
Silver/Kg ₹ 1,48,900/-
Platinum ₹ 60,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

सतरंजीपुरा चौक येथे आयोजित कार्यक्रमात स्थायी समितीचे सभापती प्रदीप पोहाणे, परिवहन समितीचे सभापती बंटी कुकडे,सदस्य नितीन साठवणे, संजय महाजन,सतरंजीपुरा झोन सभापती अभिरुची राजगिरे, नेहरू नगर झोन सभापती समिता चकोले, नगरसेविका मनिषा कोठे, परिवहन व्यवस्थापक शिवाजी जगताप, प्रशासकीय अधिकारी रवींद्र पागे, श्रम अधिकारी अरुण पिपुरडे, बस ऑपरेटर ट्रॅव्हल टाईमचे सदानंद काळकर, आर.के.सिटीचे नीलमणी गुप्ता, हंसा ट्रॅव्हल्सचे जे.पी. पारेख, डीम्सचे टीम लीडर सूर्यकांत अंबाडेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी आमदार कृष्णा खोपडे, स्थायी समिती सभापती प्रदीप पोहाणे, परिवहन सभापती बंटी कुकडे यांनी फीत कापून ‘मिनी बस’चे लोकार्पण केले. पारडी आणि बर्डी या मार्गावर धावणाऱ्या बसमध्ये लोकार्पणानंतर सर्व मान्यवरांनी प्रवास केला.

याप्रसंगी बोलताना आमदार कृष्णा खोपडे म्हणाले, नागपूर शहरातील खासगी वाहतूक कमी व्हावी यासाठी सार्वजनिक वाहतूक सक्षम बनविण्याचा प्रयत्न नागपूर महानगरपालिका आणि स्थानिक नेतृत्वाच्या वतीने होत आहे. मुख्य रस्त्यांसोबतच अनेक वस्त्यांमधील लहान रस्त्यांवर असलेल्या लोकांनाही ‘आपली बस’ची सेवा मिळावी या हेतून मिनी बस आता मनपा परिवहन विभागाच्या ताफ्यात दाखल झाली आहे. अशा आणखी बसेस आणण्याचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले.

सभापती जितेंद्र (बंटी) कुकडे म्हणाले, परिवहन सेवा पर्यावरणपूरक करण्याचा आमचा मानस आहे. त्यादृष्टीने परिवहन समितीचे प्रयत्न सुरू आहेत. अर्थसंकल्पातही त्या दृष्टीने तरतूद करण्यात आली आहे. ‘चलो’ ॲपच्या माध्यमातून परिवहन सेवा अधिकाधिक लोकाभिमुख बनविण्याचा आमचा प्रयत्न आहे. महिलांसाठी लवकरच ‘तेजस्विनी’ बसही ‘आपली बस’च्या ताफ्यात दाखल होत आहे. लोकांनी या सेवेचा उपयोग करावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केली.

मिनी बसचे लोकार्पण झाल्यानंतर कार्यक्रमाला उपस्थित नागरिकांनीही बसमध्ये प्रवास केला. कार्यक्रमाला मनपाचे पदाधिकारी, अधिकारी व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Advertisement
Advertisement