Published On : Mon, May 27th, 2019

महापालिकेतर्फे गोरेवाडा तलाव परिसरात स्वच्छतेचा जागर

Advertisement

महापौरांसह स्वयंसेवी संस्थेचे तलाव परिसरात श्रमदान

नागपूर: नागपूर महानगरपालिका आणि पर्यावरण स्वयंसेवी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी गोरेवाडा तलाव स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. या स्वच्छता मोहिमेमध्ये महापौर नंदा जिचकार व नगरसेवक हरिश ग्वालबंशी यांच्यासह गोरेवाडा जंगल ट्रेकर्स, आय क्लिन, पर्यावरण प्रेरणा विदर्भ, स्वच्छ असोसिएशन या स्वयंसेवी संस्थेच्या कार्यकर्त्यांनी श्रमदान केले.

नागपूर महानगरपालिकेद्वारे तलाव स्वच्छता अभियान मोठ्या प्रमाणावर राबविण्यात येते. यावर्षीही हे तलाव स्वच्छता अभियान सुरू करण्यात आले आहे. या स्वच्छता अभियानामध्ये सर्व स्वयंसेवी संस्थांनी सहभाग घेण्याचे आवाहन मनपातर्फे करण्यात आले आहे. गोरेवाडा तलाव परिसरातील काही स्वयंसेवी संस्थांनी पुढाकार घेऊन तलाव परिसर स्वच्छ करण्याचा पुढाकार घेतला आहे. यामध्ये स्वच्छ असोसिएशनच्या अनसूया छाब्रानी, शरद पालीवाल, दिलीप तभाने, प्रशांत कडू आणि मेअर इनोव्हेशन अवार्डची संपूर्ण चमू सहभागी होती.

यावेळी महापौर नंदा जिचकार यांनी तलाव परिसरातील ट्रॅकची पाहणी केली. तलाव स्वच्छ ठेवण्यासाठी प्रत्येक नागरिकांनी पुढाकार घ्यायला हवा. तलावात व सभोवतालच्या परिसरात कचरा होणार नाही याची प्रत्येकानी काळजी घ्यायला हवी. आपणही कचरा टाकू नये व इतरांना टाकू देऊ नये, असा सल्ला महापौरांनी यावेळी दिला. तलाव परिसरानंतर महापौर नंदा जिचकार यांनी फेण्ड्स कॉलनीमध्ये जाऊन स्वच्छता मोहिम राबविली. यावेळी त्यांनी जागृती कॉलनीमधील अमृत की खेती या प्रकल्पाला भेट दिली. यावेळी महापौर नंदा जिचकार यांच्यासह त्यांचे पती शरद जिचकार प्रामुख्याने उपस्थित होते.

या स्वच्छता अभियानामध्ये योगेश अनेजानी, तुषार पांडे, वंदना मुजुमदार, संदीप अग्रवाल, आदीत्य पाठक, रूपेंद्र नंदा, अलका कुशवाह, अरविंद गावंडे यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.