Published On : Wed, Apr 10th, 2019

हावडा-अहमदाबाद एक्स्प्रेसमधील प्रवाशांचा मतदानाचा संकल्प

Advertisement

हावडा-अहमदाबाद एक्स्प्रेसमधील प्रवाशांचा मतदानाचा संकल्प

नागपूर: ‘सिस्टीमॅटिक वोटर्स एज्युकेशन ॲण्ड इलेक्ट्रोल पार्टिसिपेशन’ अंतर्गत निवडणूक आयोग आणि भारतीय रेल्वेच्या माध्यमातून प्रवासी मतदारांमध्ये प्रभावीपणे जनजागृती करण्यात येत आहे. याच कार्यक्रमाचा एक भाग म्हणून आज (ता. ९) हावडा-अहमदाबाद एक्स्प्रेसचे नागपूर रेल्वे स्थानकावर जल्लोषात स्वागत करण्यात आले. जिल्हा प्रशासन आणि रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी येत्या लोकसभा निवडणुकीत मतदान करण्याचे आवाहन केले. आवाहनाला प्रतिसाद देत रेल्वेतील प्रवाशांनी मतदानाचा संकल्प केला.

Gold Rate
07 May 2025
Gold 24 KT 97,500/-
Gold 22 KT 90,700/-
Silver/Kg 96,700/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

मतदार जनजागृती करणाऱ्या हावडा-अहमदाबाद (गाडी क्र. १२८३४) चे नागपूर स्थानकावर राज्य निवडणूक आयोगाच्या वतीने निवडणूक नोडल अधिकारी (शहर) तथा मनपाच्या उपायुक्त डॉ. रंजना लाडे, निवडणूक नोडल अधिकारी (नागपूर ग्रामीण) राजेंद्र भुयार आणि रेल्वेच्या वतीने स्टेशन निदेशक दिनेश नागदिवे यांनी स्वागत केले. येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत सर्व नागरिकांनी मतदान करावे. इतरांनाही मतदानासाठी प्रोत्साहित करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले. अधिकाऱ्यांनी यावेळी प्रवाशांशी हितगूज साधले.

सदर रेल्वे गाडीवर मतदानाची जनजागृती करण्याच्या दृष्टीने पोस्टर्स लावण्यात आले आहे. निवडणूक आयोगाचे राज्य ॲम्बेसेडर अरुनिमा सिन्हा, चेतेश्वर पुजारा, पंकज त्रिपाठी यांचे मतदानाचे आवाहन करणारे छायाचित्रासह संदेश होते. मतदारांनी मतदानासंदर्भातील तक्रारीसाठी १९५० टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले होते. निवडणूक हा राष्ट्रीय महोत्सव असून या महोत्सवात प्रत्येक नागरिकाने सहभागी होण्याचे आवाहनही रेल्वेच्या माध्यमातून करण्यात आले.

यावेळी जिल्हा प्रशासनातर्फे रेल्वे फलाटावर सेल्फी प्वॉईंटही उभारण्यात आला होता. प्रवाशांनी त्यासमोर सेल्फी काढत सोशल मीडियावरून मतदानाचा संदेश देण्याचा संकल्प केला. स्वत: मतदान करू आणि इतरांनाही मतदानासाठी प्रोत्साहित करू, असे आश्वासन प्रवाशांनी दिले.

हावडावरून निघालेल्या या गाडीचे प्रत्येक स्थानकावर स्वागत करण्यात येत आहे. सदर गाडी पश्चिम बंगालच्या चार, झारखंड राज्यातील दोन, ओरिसामधील सहा, छत्तीसगडमधील १४, महाराष्ट्रातील २६ आणि गुजरातमधील ११ रेल्वे स्थानकावर थांबणार असून या प्रत्येक ठिकाणी तेथील प्रशासनातर्फे आणि रेल्वेतर्फे स्वागत करीत मतदानाचे आवाहन करण्यात येणार आहे. यापूर्वी नागपूर स्थानकावर केरला एक्स्प्रेस, हिमसागर एक्स्प्रेसचेही स्वागत करण्यात आले.

रात्री ७.३० वाजता निवडणूक नोडल अधिकारी (नागपूर शहर) डॉ. रंजना लाडे आणि निवडणूक नोडल अधिकारी (नागपूर ग्रामीण) राजेंद्र भुयार यांनी हिरवी झेंडी दाखवून हावडा-अहमदाबाद एक्स्प्रेसला जनजागृतीच्या पुढील प्रवासाकरिता रवाना केले. यावेळी मनपा शिक्षण विभागाचे विनय बगले, विनीत टेंभूर्णे, कपिलनगर हिंदी माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र पुसेकर, जि.प.चे विस्तार अधिकारी प्रभाकर वाघ, शेषराव चव्हाण, विलास लोखंडे, धनराज शिवरकर, आनंद आंबेकर, नितीन फुल्लुके, रेल्वेचे राहुल लांडगे, प्रशांत चवरे, संपत धनजोडे, मधुकर गायकवाड, प्रवीण रोकडे, संजय खंगार उपस्थित होते.

सोशल मीडिया आणि स्मार्ट स्क्रीनवरून मतदानाचे आवाहन
नागपूर महानगरपालिकेच्या अधिकृत फेसबुक पेज आणि ट्विटर पेजवरून प्रभावीपणे मतदान जनजागृती करण्यात येत आहे. मनपाच्या फेसबुक पेजच्या कव्हरवर ‘सिटी ऑयकॉन्स’चा व्हिडिओ टाकण्यात आला आहे. शहरातील विविध क्षेत्रात नावाजलेल्या ‘आयकॉन्स’कडून नागपूर शहरातील मतदारांना मतदानाचे आवाहन करण्यात येत आहे. ‘मी मतदान करणारच, आपणही करा’ असा संदेश या ऑयकॉन्सकडून देण्यात येत आहे.

१ एप्रिलपासून दररोज मतदानाचे आवाहन करणारे क्रिएटीव्हही सोशल मीडियावर अपलोड करण्यात येत आहे. नागपूर शहरातील स्मार्ट स्क्रीन्सवरूनही मतदानाचे आवाहन करण्यात येत आहे. ११ एप्रिल रोजी होणाऱ्या निवडणुकीत मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावावा आणि १०० टक्के मतदान करावे, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी अश्विन मुदगल, उपजिल्हा निवडणूक अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी राजलक्ष्मी शहा, मनपा आयुक्त अश्विन बांगर यांनी केले आहे.

Advertisement
Advertisement