मतदारांशी संवादातून निवडावा उमेदवार दुतर्फी संवादाची गरज व्यक्त
नागपूर: लोकसभा निवडणुकीचा ज्वर सुरू झाला असून सोशल मिडियावर विविध पक्ष तसेच त्यांच्या उमेदवारांच्या मोठ्या प्रमाणात पोस्ट झळकत आहे. राजकीय पक्षांकडून मतदारांना आकर्षित करण्यासाठी एकतर्फी मारा नागरिकांवर केला जात आहे. मात्र, राजकीय पक्षांनी उमेदवार देतानाही स्थानिक जनतेसोबत संवादासाठी ‘सोशल मिडिया’चा वापर केल्यास लोकशाहीच्या मंदिरात स्वच्छ प्रतिमा व जनतेला मान्य असलेले लोकप्रतिनिधी पोहोचतील, अशी चर्चा सुरू झाली आहे.
सोशल मिडिया आता निवडणुकीतील प्रमुख अस्त्र बनले आहे. अमेरिका, ब्राझील, फिलिपिन्स आदी देशांमधील निवडणूक सोशल मिडियाच्या आधारेच लढली गेली. मागील लोकसभा निवडणुकीतही सोशल मिडियाने महत्त्वाची भूमिका बजावली. यंदाच्या निवडणुकीत मागील निवडणुकीच्या तुलनेत सोशल मिडियाचा वापर मोठ्या प्रमाणात होत असून आता राजकीय पक्ष, उमेदवारापासून ते कार्यकर्तेही आपल्या नेत्यांच्या कामांचे गुणगाण व विरोधकांवर कडवे प्रहार करताना दिसून येत आहे. प्रत्येक चांगली, वाईट पोस्टचा मारा सोशल मिडियातून नागरिकांवर केला जात आहे. मात्र, नागरिकांवर राजकीय पक्षांकडून, उमेदवारांकडून हा एकतर्फी मारा सुरू असल्याचे मत सोशल मिडिया विश्लेषक अजित पारसे यांनी व्यक्त केले. राजकीय पक्षांकडून सध्या उमेदवार लादला जात आहे. त्याऐवजी ‘सिलेक्शन बिफोर इलेक्शन’ अर्थात राजकीय पक्षांनी सोशल मिडियाच्या माध्यमातूनच थेट जनतेला विचारून उमेदवार दिल्यास लोकशाही आणखी बळकट होईल. उमेदवार निवड प्रक्रियेत राजकीय पक्षांनी नागरिकांना सोशल मिडियाद्वारे सामावून घेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत वंचित, शोषितांना न्याय देणारी प्रक्रिया आणखी बळकट करावी, असा मतप्रवाहही आता पुढे येत आहे. स्टॅटिस्टा डॉट कॉम संकेतस्थळाच्या माहितीनुसार देशात आज 38 कोटी नागरिक 24 तास सोशल मिडियाचा वापर करीत आहे. आज राजकीय पक्ष आपल्या कार्यकर्त्यांद्वारे, स्वयंसेवकांद्वारे या नागरिकांपर्यंत आपले संदेश पोहोचवितच आहे व अनुकूल वातावरण तयार करण्याचा प्रयत्न करीत आहे. या नागरिकांचे मत घेणे सहज शक्य आहे. स्मार्टफोन, इंटरनेटमुळे बळकट झालेला सोशल मिडिया राजकीय पक्षाच्या पथ्यावर पडत आहे. त्यामुळेच अलीकडे खर्चिक व वेळ घालविणारे मोर्चे सभांऐवजी फेसबुक, वॉट्सअपमधून कधी विविध चित्रे, व्यंगचित्रे, व्हीडीओच्या माध्यमातून राजकीय पक्ष त्यांचे विचार नागरिकांपुढे मांडत आहे. मात्र हा संवाद एकतर्फी न राहता दुतर्फी होण्याची गरज पारसे यांनी व्यक्त केली.
देशात सोशल मिडिया वापरकर्त्यांची आकडेवारी
– स्मार्टफोन वापरणाऱ्यांची संख्या 37.38 कोटी
– वॉट्सअप वापरकर्ते 20 कोटी
– फेसबुक वापरकर्ते 30 कोटी
– ट्विटर वापरकर्ते 3.44 कोटी
एखाद्याचे व्यंगचित्र, एखाद्यावर नकारात्मक टिप्पणी, ट्रोलिंग हे सारे सोशल मिडियावर दिसून येत आहे. याऐवजी सोशल मिडियाचा व्याप बघता दुर्बल, शोषित, वंचितांचे विचार, मत ऐकूण घेत राजकीय पक्षांनी त्या त्या भागातील उमेदवार ठरवावे, म्हणजे ‘सिलेक्शन बीफोर इलेक्शन’ प्रक्रिया राबवावी. त्यामुळे राष्ट्रीय हितासोबतच लोकशाहीचे बळकटीकरणही साध्य होईल.