पालकमंत्र्यांचे प्रशासनाला निर्देश जि.प.ने केली 4000 घरकुले पूर्ण
नागपूर: प्रधानमंत्री घरकुल योजनेअंतर्गत शहर आणि ग्रामीण भागातील घरकुलांसाठीच्या जागांचे सर्वेक्षण लवकर पूर्ण करून यादी अंतिम करावी, निविदा प्रक्रिया करून जानेवारी अखेरपर्यंत घरकुलांचे काम सुरु करावे असे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज एनएमआरडी, म्हाडा, नगर परिषदांना आज दिले.
हैद्राबाद हाऊस येथे या विषयावरील आढावा घेण्यासाठ़ी एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत जिल्हा परिषद, एनएमआरडीए, महानगर पालिका, नगर परिषदा यांनी घरकुलांबाबत केलेल्या कामाचा आढावा पालकमंत्र्यांनी घेतला. जिल्हा परिषदेला 16 हजार घरकुलांचे लक्ष्य दिले होते. यापैकी4 हजार घरकुलांचे काम जि.प.ने पूर्ण केले आहे. उर्वरित घरकुलांचे काम सुरु असल्याचे सांगण्यात आले.
केएमपीजी कंपनीने सर्वेक्षणाचे काम लवकर पूर्ण करून आपला अहवाल संबंधित शासकीय विभागाना देण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले. 17 नोव्हेंबर 2018 शासन निर्णयानुसार सर्व शासकीय जागांवर असलेले अतिक्रमण नियमित करून त्या ठिकाणी संबंधितांना मालकी हक्काचे पट्टे द्यायचे आहेत. तसेच घरकुले बांधून द्यायची आहेत. झुडुपी जंगलांच्या जागेबाबत शासन सर्वोच्च न्यायालयात गेले असून त्यावरील निर्णय लागल्यानंतर लगेच झुडुपी जंगलाच्या जागेवर वसलेल्या कुटुंबांनाही या योजनेतून घरकुले देण्यात येतील.
जिल्हा परिषदेने तयार केलेली व अन्य शासकीय संस्थांकडून आलेली 55 हजार घरकुलांची यादी एनएमआरडीएकडे देण्यात आली आहे. एनएमआरडीएतर्फे यावर कारवाई करण्यात येत असून एनएमआरडीएतर्फे बांधण्यात येणाऱ्या घरकुलांच्या जागेचे सर्वेक्षण केपीएमजी करीत आहे. नगर परिषदांनी आपल्या भागातील जागांची यादी सर्वेक्षणसाठी संबंधित संस्थेकडे द्यावी व म्हाडाला घरकुलांचे प्राकलन त्वरित पाठवावे. घरकुलांच्या कामात अधिकाऱ्यांनी दिरंगाई करू नये. पारशिवनी, बुटीबोरी, कन्हानपिंपरी,वानाडोंगरी आणि रामटेक या नगर परिषदांचे घरकुलाचे प्रस्ताव अजूनही तयार नाहीत.
महानगर पालिकेअंतर्गत शहरात या योजनेअंतर्गत बांधण्यात येणाऱ्या 10 हजार घरांची निविदा प्रक्रिया अजूनही करण्यात आली नाही. म्हाडातर्फे अत्यंत संथ गतीने या योजनेचे काम सुरु आहे. मुख्य अभियंत्यांनी गतीने ही कामे पूर्ण करावी. गेल्या 6 महिन्यात शहरातील घरकुलांचे सुरु होणे अपेक्षित होते.