Published On : Fri, Aug 17th, 2018

माजी प्रधानमंत्री अटलबिहारी वाजपेयी यांच्यावर अंत्यसंस्कार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती

Advertisement

नवी दिल्ली : माजी प्रधानमंत्री भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्यावर आज स्मृतिस्थळ येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, प्रधानमंत्री तसेच विदेशी पाहुणे यांच्यासह महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विविध राज्यांचे मुख्यमंत्री यावेळी उपस्थित होते.

श्री.वाजपेयी यांचे गुरूवारी सायंकाळी येथील एम्स रूग्णालयात दीर्घ आजाराने निधन झाले. मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी एम्स रूग्णालयात जाऊन त्यांचे दर्शन घेतले, तसेच 6-ए कृष्ण मेनन मार्गस्थित वाजपेयी यांच्या निवासस्थानी रात्री अंत्यदर्शन घेऊन श्रद्धांजली वाहिली. शुक्रवारी 10 वाजतापासून दीनदयाळ उपाध्याय मार्गावरील भाजपा मुख्यालयात त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी अंत्यदर्शन घेतले. राज्यातील मंत्री, सर्वश्री गिरीष महाजन, पंकजा मुंडे, महादेव जानकर, संभाजी पाटील -निलंगेकर यांच्यासह राज्यातील खासदार व आमदारांनीही अंत्यदर्शन घेतले.

Gold Rate
29 April 2025
Gold 24 KT 96,200/-
Gold 22 KT 89,500/-
Silver / Kg 97,200/-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

दुपारी 2.30 वाजता भाजपा मुख्यालयापासून अंत्ययात्रा निघाली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासह सर्व केंद्रीय मंत्री, मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्यासह विविध राज्यांचे मुख्यमंत्री यांनी स्मृतिस्थळापर्यंत पायी चालत अंत्ययात्रेत सहभाग घेतला. वाजपेयींना अखेरचा निरोप देण्यासाठी दीनदयाळ उपाध्याय मार्गाच्या दुतर्फा मोठ्या संख्येने जनसमूह जमला होता. ‘अटल बिहारी अमर रहे’ अशा घोषणा आणि पुष्पांच्या वर्षावाने वातावरण शोकमग्न झाले होते. बहादूर शहा मार्ग, दिल्ली गेट, दर्यागंज मार्गाने अंत्ययात्रा थेट स्मृतिस्थळ येथे पोहोचली.

अंत्यविधीसाठी विविध देशांचे प्रतिनिधी उपस्थित होते. देशाच्या वतीने कॅबिनेट सचिवांनी वाजपेयी यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र वाहिले. तीनही सेनादलाच्या प्रमुखांनी, संरक्षणमंत्री व संरक्षण राज्यमंत्री, लोकसभा अध्यक्ष, उपराष्ट्रपती, प्रधानमंत्री, राष्ट्रपती यांनीही पुष्पचक्र वाहिले. भूतान नरेश, अफगाणिस्तानचे माजी राष्ट्रपती, बांग्लादेश, श्रीलंका, नेपाळ आदी देशांच्या सर्वोच्च प्रतिनिधींनी पुष्पचक्र वाहिले. वाजपेयी यांच्या नात निहारिका यांच्याकडे मानाचा राष्ट्रध्वज सोपविण्यात आला. त्यांच्या मानस कन्या नमिता भट्टाचार्य यांनी मुखाग्नी दिला.

वाजपेयी यांचे अंत्यदर्शन घेता यावे म्हणून केंद्र शासन व केंद्र शासनाशी संलग्न कार्यालये दुपारनंतर बंद ठेवण्यात आली होती. तसेच सात दिवसांसाठी देशभरात राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे.

Advertisement
Advertisement