Published On : Fri, Jul 27th, 2018

महाजेम्सने कुंभार व्यावसायिकांना वारेगाव फ्लाय अॅश क्लस्टरमध्ये स्वस्त दराने जमीन द्यावी

Advertisement

नागपूर : मेहनतीतून कुंभार व्यावसायिकानी परंपरागत व्यवसाय जोपासला आहे. बदलते तंत्रज्ञान, स्मार्ट शहर, पर्यावरणविषयक कठोर नियम लक्षात घेता, कुंभार व्यावसायिकांनी बदल स्वीकारणे काळाची गरज बनली आहे. महाजेम्सने कुंभार व्यावसायिकांना औद्योगिक क्लस्टरमध्ये पर्यायी जमीन स्वस्त दराने उपलब्ध करून द्यावी त्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देऊन प्रगतीची दारे खुली करून द्यावी असे प्रतिपादन आमदार कृष्णा खोपडे यांनी केले. विद्युत भवन नागपूर सभागृहात महाजेम्सद्वारा आयोजित बैठकीत प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते.

बैठकीच्या अध्यक्षस्थानी महाजेम्सचे व्यवस्थापकीय संचालक श्याम वर्धने, प्रमुख अतिथी म्हणून आमदार कृष्णा खोपडे, महाजेम्सचे संचालक सुधीर पालीवाल, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या उप प्रादेशिक अधिकारी हेमा देशपांडे, नागपूर सुधार प्रन्यासचे कार्यकारी अधिकारी प्रशांत भांडारकर, कुंभार सेवा समितीचे अध्यक्ष राजीव खरे, विदर्भ कुंभार समाज विकास समितीचे सुरेश हारोडे तसेच प्रमोद पेंडके ,महेंद्र राउत प्रामुख्याने उपस्थित होते.

Gold Rate
3 May 2025
Gold 24 KT 93,800/-
Gold 22 KT 87,200/-
Silver/Kg 94,500/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

पारंपारिक वीट भट्ट्या व त्यामुळे होणारे प्रदूषण रोखण्याकरिता सर्वोच्च न्यायालय, राष्ट्रीय हरित लवाद यांनी शहरी वस्त्यांच्या ५०० मीटर परिसरात पारंपारिक पद्धतीने वीट उत्पादन करता येणार नाही असे निर्देश दिले आहेत. राज्याचे मुख्यमंत्री व उर्जामंत्री यांच्या पुढाकारातून औष्णिक विद्युत केंद्र परिसरातील जागेत राखेवर आधारित क्लस्टर निर्माण करून परंपरागत कुंभार व्यावसायिकांना चांगली जागा,उद्योगासाठी कर सवलत, कर्ज योजना, आवश्यक परवानग्या, पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यामुळे,राखेवरील वाहतूक खर्चात मोठी बचत होणार आहे.

तरी कुंभार व्यावसायिकांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करून औद्योगिक क्लस्टरमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन श्याम वर्धने यांनी केले. प्रारंभी कार्यकारी अभियंता उपेंद्र पाटील यांनी महाजेम्सची वाटचाल, वारेगाव औद्योगिक क्लस्टर येथील पायाभूत सुविधा ,आधुनिक पद्धतीने राख आधारित विटांचे उत्पादनाबाबत चित्रफित व संगणकीय सादरीकरण केले.

सुधीर पालीवाल यांनी राज्य शासनाचे राख वापर धोरण, महाजेम्सची संकल्पना आणि आगामी काळात राखेवर आधारित उद्योगांना मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध असल्याचे सांगितले. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने वीटभट्टी उत्पादकांसाठी मार्गदर्शक नियमावली तयार केली असून त्याबाबतची माहिती हेमा देशपांडे यांनी दिली. वारेगाव औद्योगिक क्लस्टरमध्ये कुंभार व्यावसायिकांना पर्यायी जागा दिल्यास आम्ही जाण्यास तयार असल्याचे राजीव खरे यांनी सांगितले.

भरतवाडा, पुनापूर परिसरातील कुंभार समाजाच्या पारंपारिक व्यवसायाचे पुनर्वसन करून सदर जागेवर प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत नागपूर सुधार प्रन्यास मार्फत माफक किमतीची घरे बांधण्यात येणार असल्याने औद्योगिक क्लस्टर निर्मित विटांसाठी आगामी काळात संधी उपलब्ध होणार असल्याचे प्रशांत भांडारकर यांनी सांगितले.

बैठकीचे सूत्रसंचालन महाजेम्सचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता प्रशांत देशपांडे यांनी तर आभार प्रदर्शन कार्यकारी अभियंता उपेंद्र पाटील यांनी केले. याप्रसंगी उप मुख्य अभियंता सुखदेव सोनकुसरे, अधीक्षक अभियंते परमानंद रंगारी, कार्यकारी अभियंता राजेंद्र मंडवाले, उप कार्यकारी अभियंता पंकज धारस्कर तसेच कुंभार व्यावसायिक पंचकमेटी सदस्य योगेश आमगे, श्याम आमगे, कमलेश जुगेले, लक्ष्मण अवथे, ओंकार आमगे, राजेश जुगेले, सुनील कन्पे, धीरज देहरे प्रामुख्याने उपस्थित होते.

कोराडी –खापरखेडा फ्लाय अॅश औद्योगिक क्लस्टरसाठी शासन निर्णय :
मा.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , मा.उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे व आमदार कृष्णा खोपडे यांच्या पुढाकाराने महानिर्मितीच्या खापरखेडा, कोराडी औष्णिक विद्युत केंद्राकरिता संपादित केलेल्या जमिनीच्या वापराचा उद्देश बदलून त्यापैकी काही जमिनीवर राखेवर आधारित उद्योग उभारण्यासाठी, औद्योगिक समूह विकसित करण्यासाठी १० जुलै २०१८ रोजी शासन निर्णय पारित करण्यात आला आहे. आता राखेवर आधारित उद्योगांना चालना मिळणार आहे.

Advertisement
Advertisement