Published On : Thu, Jul 26th, 2018

‘चलो चले प्रगति की ओर’ अभियानाला महिलांचा उत्स्फुर्त प्रतिसाद

Advertisement

नागपूर: आजच्या आधुनिक युगात महिला पुरूषांच्या बरोबरीने वाटचाल करीत आहेत. प्रत्येक क्षेत्रात आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटविणा-या महिलांमध्ये गृहिणींचे योगदान महत्वपूर्ण आहे. घराची जबाबदारी सांभाळणा-या महिलांच्या सक्षमीकरणासाठी, समाजात सन्मानाचे स्थान मिळविण्यासाठी आता एकत्र येणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन नागपूर महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण समितीच्या सभापती प्रगती पाटील यांनी केले.

नागपूर महानगरपालिका समाजकल्याण विभाग तसेच महिला व बालकल्याण समितीच्या वतीने गुरूवारी (ता. २६) धरमपेठ झोनमधील राम नगर येथील कर्नाटक संघाच्या सभागृहात महिला बचत गटांच्या सदस्यांकरिता ‘चलो चले प्रगति की ओर’ अभियानांतर्गत कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.

Gold Rate
2 May 2025
Gold 24 KT 93,700/-
Gold 22 KT 87,100/-
Silver/Kg 95,400/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

यावेळी प्रगती पाटील बोलत होत्या. शहरी महिला बचत गटातील महिलांना लघुउद्योगाचे धडे देत त्यांना सक्षम बनविण्याच्या उद्देशाने या अभियाला सुरूवात करण्यात आली. व्यासपीठावर महिला व बालकल्याण समिती प्रगती पाटील यांच्यासह उपसभापती विशाखा मोहोड, नगरसेविका उज्ज्वला शर्मा, शिल्पा धोटे, परिणीता फुके, भाजपा महिला आघाडीच्या अध्यक्ष किर्तीदा अजमेरा, शितल पाटील, स्वच्छ असोसिएशनच्या सुमीता मुखर्जी, उषा बागडी उपस्थित होते.

पुढे बोलताना सभापती प्रगती पाटील म्हणाल्या, उत्तमपणे कुटुंबाचा भार वाहणा-या महिलांमध्ये व्यवस्थापनाचे उत्तम कौशल्य असते. लघु उद्योग हा स्त्रीच्या उन्नतीचा मार्ग आहे. महिला बचत गटाच्या माध्यमातून त्या व्यवसायात योग्य भरारी घेऊ शकतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

महिलांच्या उत्थानासाठी शासनाकडून अनेक योजना राबविल्या जात आहेत. या योजनांची पूरेपूर माहिती घेउन त्याच्या अंमलबजावणीसाठी कशी करावी, शिवाय बँकांकडून आर्थिक सहकार्य कसे मिळविता येईल याची माहिती एकत्रितरित्या मिळावी, यासाठी प्रत्येक झोनमध्ये अभियानाची ओळख करून देणारे कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत. स्वयं सक्षमीकरणासाठी महिलांनी पुढाकार घेत अभियानात सहभागी व्‍हावे, असे आवाहन महिला व बालकल्याण समितीच्या सभापती प्रगती पाटील यांनी यावेळी केले.

स्त्रियांनो आत्मनिर्भर बना : किर्तीदा अजमेरा

धावत्या युगात स्वत:चे अस्तीत्व टिकवून नाव लौकीक करायचे असेल तर स्त्रियांनो आत्मनिर्भर बना, असा मंत्र भाजप महिला आघाडीच्या अध्यक्ष किर्तीदा अजमेरा यांनी दिला. विविध क्षेत्रात आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटविणा-या महिलांनी स्वयं सक्षमीकरणासाठी एकत्र येणे गरजेचे आहे. एकत्र येण्यातून घडणा-या संवादातून नव्‍या संकल्पनांचा उदय होतो, याच नव्‍या संकल्पनांना प्रत्यक्षात उतरवून नव्‍या बदलासाठी सज्ज व्‍हा, असे आवाहनही त्यांनी केले.

Advertisement
Advertisement