Published On : Tue, Apr 17th, 2018

पैसे भरून प्रलंबित कृषीपंपांना आता एचव्हीडीएस योजनेतून वीज जोडणी

Mahavitaran Logo Marathi

नागपूर: पैसे भरून प्रलंबित असलेल्या सुमारे २ लाख २४ हजार कृषीपंप ग्राहकांना आता उच्चदाब वितरण प्रणालीतून वीज कनेक्शन देण्यात येणार आहे. यामुळे २ शेतकऱ्यांना एक रोहित्र या एचव्हीडीएस प्रणालीला आज मंत्रिमंडळाने मान्यता दिली असल्याची माहिती ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी एका पत्रकार परिषदेत दिली.

विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कृषीपंपधारक ग्राहकांना उच्चदाब वितरण प्रणाली (एचव्हीडीएस) मार्फत वीज कनेक्शन देण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार पैसे भरले पण वीज कनेक्शन मिळाले नाही अश्या शेतकऱ्यांना आता या योजनेतून वीज कनेक्शन. देण्यात येणार आहेत.

Gold Rate
18 Aug 2025
Gold 24 KT ₹ 1,00,100 /-
Gold 22 KT ₹ 93,100 /-
Silver/Kg ₹ 1,15,400/-
Platinum ₹ 48,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

सध्याच्या पध्दतीनुसार शेतकऱ्यांना ६५ व १०० केव्हीए क्षमतेच्या रोहित्रातून १५ ते२० कृषी ग्राहकांना विद्युत पुरवठा करण्यात येतो. यामुळे लघुदाब वाहिनीची लांबी वाढते व वीज हानी मोठ्या प्रमाणात होते. शिवाय शेतकऱ्यांना कमी दाबाने वीज पुरवठा होतो. वीज पुरवठ्यात वारंवार बिघाड होऊन वीज पुरवठा खंडित होणे, तांत्रिक वीज हानी, रोहित्र बिघाड, विद्युत अपघात आदींना म‍हावितरणला सामोरे जावे लागते. या सर्व अडचणींवर एचव्हीडीएस योजनेद्वारे मात करता येणे शक्य होणार आहे.

उच्चदाब प्रणालीत उच्चदाब वाहिन्यांवरील विद्युत प्रवाह मोठया प्रमाणात कमी होईल. या प्रणालीमुळे वाहिन्यांवर आकडे टाकून वीज चोरी करता येणार नाही. या योजनेवर ४४९६. ६९ कोटी व नवीन उपकेंद्रासाठी लागणारा अंदाजे खर्च ५५१ . ४४ कोटी अश्या एकूण ५०४८. १३ कोटी रूपये इतक्या खर्चाला मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. तसेच विदर्भ व मराठवाडा विभागातील कृषीपंपांना वीज जोडणी देणे या योजनेअंतर्गत सन २०१८-१९ व २०१९-२० साठी अर्थसंकल्पात तरतूद करण्यात येईल.

गेल्या तीन वर्षात ४ लाखावर कृषीपंपांना वीज कनेक्शन देण्यात आले असून महावितरणद्वारे प्रति कनेक्शन १. लाख इतका निधी खर्च करण्यात आला. एचव्हीडीएस योजनेअंतर्गत प्रति कृषीपंप २ लाख खर्च अपेक्षित आहे.सध्याच्या लघुदाब प्रणालीपेक्षा उच्चदाब वितरण प्रणालीचे फायदे अधिक आहेत. गेल्या मार्च २०१८ पर्यंत २ हजार ४८७ कृषी पंपांचे ऊर्जीकरण होणे अपेक्षित आहे. त्यासाठी निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून कामाचे कार्यादेशही देण्यात आले आहेत. या वर्षात नोव्हेंबर २०१७ अखेर पर्यंत ४८ हजार ४३७ कृषीपंपांचे ऊर्जीकरण करण्यात आले असून ३० हजारावर कृषीपंपांचे वीज कनेक्शनचे काम प्रगतीपथावर आहे.

हा प्रकल्प यशस्वीरीत्या पूर्ण होण्यासाठी महावितरणच्या मुख्यालयात एक स्वतंत्र कक्ष स्थापण्यात येणार आहे. एचव्हीडीएस योजना लागू झाल्यानंतर लघुदाब व उच्चदाब वितरण प्रणाली या दोन्ही प्रणाली कार्यरत राहतील, असेही ऊर्जामंत्री बावनकुळे यांनी सांगितले.

Advertisement
Advertisement