Published On : Sun, Feb 18th, 2018

पत्रकार रविकांत कांबळे यांच्या आईची आणि मुलीची हत्या

नागपूर: नागपूर टुडेचे पत्रकार रविकांत कांबळे यांच्या आईची मुलीची हत्या झाल्याची धक्कादायक घटना नागपुरात घडली आहे. नागपूरच्या हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या उमरेड रोड परिसरात एका महिलेचा आणि तिच्या नातीचा मृतदेह पोलिसांना सापडला. या दोन्ही मृतदेहांची ओळख पटवण्यात आली असून हे मृतदेह रविकांत कांबळे यांच्या आई आणि मुलीचेच आहेत. नागपूर टुडे या वेब पोर्टलचे क्राइम रिपोर्टर रविकांत कांबळे यांची आई आणि मुलगी कालपासून बेपत्ता होत्या. त्यांचा खून झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या दोघींचे अपहरण करुन त्यांची हत्या केली गेली असावी असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.

उषा सेवकदास कांबळे असे रविकांत कांबळे यांच्या आईचे नाव आहे. राशी रविकांत कांबळे हे त्यांच्या मुलीचे नाव आहे. शनिवारी संध्याकाळपासून या दोघीही बेपत्ता होत्या. त्यानुसार रविकांत कांबळे यांनी पोलिसांत त्या दोघी हरवल्याची तक्रारही दाखल केली होती. तसेच फेसबुकवरही रविवारी सकाळी या दोघींचा फोटो पोस्ट केला होता.

Gold Rate
18 Aug 2025
Gold 24 KT ₹ 1,00,100 /-
Gold 22 KT ₹ 93,100 /-
Silver/Kg ₹ 1,15,400/-
Platinum ₹ 48,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

रविकांत कांबळे यांनी दिलेल्या तक्रारीनंतर पोलीस या दोघींचा शोध घेत होते. त्यांना उमरेड रोड परिसरातच गोणीमध्ये भरलेल्या अवस्थेत आजी आणि नातीचा मृतदेह सापडला. या मृतदेहांची ओळख पटवल्यानंतर हे दोन्ही मृतदेह उषा कांबळे आणि राशी कांबळे यांचेच असल्याचे स्पष्ट झाले.

उषा सेवकदास कांबळे यांच्या अंगावरचे दागिने गायब झाले आहेत. तसेच त्यांच्याजवळचे पैसेही लंपास करण्यात आले आहेत. लुटीच्या उद्देशाने अपहरण करून या दोन हत्या करण्यात आल्या असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. याप्रकरणी पोलीस आता अधिक तपास करत आहेत. मात्र या धक्कादायक घटनेमुळे नागपूर पुन्हा एकदा हादरले आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे गृहमंत्रीपदही स्वतःकडेच ठेवले आहे. मात्र गेल्या तीन वर्षातील नागपुरातील गुन्ह्यांचा आलेख पाहता चोरी, लूटमार, खून, बलात्कार, कैदी पळून जाणे यांसारख्या घटना वाढीला लागल्या आहेत. गुन्हेगारांवर पोलिसांचा धाक उरलेला नाही अशीच तक्रार नागपूरकर वारंवार करत आहेत. अशा किती घटना घडल्यावर गृहखाते आणि पोलीस गुन्हेगारांना कठोर शासन करणार असा प्रश्न आता नागपूरकर विचारत आहेत.

Advertisement
Advertisement