Published On : Fri, Sep 22nd, 2017

सहकारी संस्थांनी सभासदांची भागिदारी वाढवावी – देशमुख

Advertisement

नागपूर : ‍सहकारी संस्थांनी अनुदानावर अवलंबून न राहता परस्पर सहकार्याच्या योगादानातून संस्था चालविण्याचा निर्धार केल्यास सहकारी चळवळीला उर्जीतावस्था प्राप्त होईल. तसेच सभासदांची संस्थांमध्ये भागिदारी वाढवून पणन, प्रक्रिया संस्थांतील सभासदांना सहकार्य करावे, असे आवाहन सहकार व पणन मंत्री सुभाष देशमुख यांनी आज येथे केले.

सायंटिफीक सभागृह येथे विदर्भातील पणन, प्रक्रिया संस्थांच्या कार्यशाळेचे उद्घाटन करतांना सहकार मंत्री बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विदर्भ को-ऑपरेटिव्ही मार्केटींग फेडरेशनचे अध्यक्ष डॉ.राजेंद्र शिंगणे होते. यावेळी आमदार अनिल सोले, डॉ.आशिष देशमुख, राज्य सहकारी संघाचे अध्यक्ष ॲड . तिडके, मुख्य कार्यकारी अधिकारी उत्तम इंदलकर तसेच विदर्भातील सर्व जिल्ह्यातील पणन, प्रक्रिया सहकारी संस्थांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यशाळेचे आयोजन विदर्भ को-ऑपरेटिव्ह मार्केटींग फेडरेशनच्या सहकार्याने करण्यात आले होते.

राज्यातील सहकारी चळवळीला उर्जीतावस्था प्राप्त होण्यासाठी अनुदानावर अवलंबून न राहता सभासदांच्या विकासासोबत परस्पर सहकार्याचा योगदानातून संस्था चालविण्याचा निर्धार करण्याचे आवाहन करतांना सहकार मंत्री सुभाष देशमुख म्हणाले की, सभासद शेतकऱ्यांना आत्महत्यासारखे टोकाचे पाऊल उचलण्यापासून परावृत्त करणे हे सहकारी संस्थांचे प्रथम उद्दीष्ट असावे. महाराष्ट्र राज्य सहकारी संघाने 100 वर्षाची वाटचाल यशस्वीपणे पूर्ण केली आहे. निस्वार्थपणे काम केलेल्या नेतृत्वाचा मोठा त्याग यामागे आहे. राज्य सहकारी संघासारख्या शिखर संस्थेला शासन सकारात्मक भुमिका घेऊन निश्चित मदत करेल अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

सहकारी संस्था राजकारण विरहीत चालविल्यास सभासदांना लाभ मिळेल. तसेच शासनही अशा संस्थांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहील. शोषणमुक्त समाज निर्मितीसाठी सहकारी संस्थांनी सभासदांचा गरजा लक्षात घेऊन भागिदारी वाढवावी. त्यासाठी पणन, प्रक्रिया संस्थांनी आपल्या सभासदांना, बचत गटांनी उत्पादीत केलेल्या मालाच्या वितरणामध्ये सहभाग दिल्यास बेरोजगारीचा प्रश्न सुटू शकेल व आर्थिक लाभ होईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
डॉ.राजेंद्र शिंगणे यांनी विदर्भातील पणन, प्रक्रिया संस्था याजणू शासन आणि संघीय संस्थाकडून मिळणाऱ्या कमिशनच्या संजीवनीवर जीवंत आहे. असे चित्र आज दुर्देवाने उभे झाले आहे. ते बदलण्यासाठी दि विदर्भ को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनच्या कार्याचा आदर्श समोर ठेवून विदर्भातील पणन व प्रक्रिया संस्थानी आपली कार्यप्रणाली निश्चित करावी असे आवाहन केले.

प्रास्ताविकात राज्य सहकारी संघाचे अध्यक्ष ॲड. सुहास तिडके यांनी राज्य सहकारी संघासारखी सहकारी शिक्षण, प्रशिक्षण देणारी संस्था जेव्हा सामुहिक नेतृत्वातून शतकी वाटचाल पूर्ण करते.

याप्रसंगी आमदार प्रा. अनिल सोले, आशिष देशमुख यांनी दुर्बल सहकारी संस्थांना शासनाच्या अनुदानाचे नव्हे तर भक्कम पांठीब्याची गरज व्यक्त केली. कार्यशाळेत विशेष मार्गदर्शक म्हणून डॉ.राजाराम दिघे व अटल महापणन विकास अभियानाचे व्याख्याते गणेश शिंदे यांनी पणन व प्रक्रियास ह. संस्थांना स्पर्धेच्या बाजार व्यवस्था टिकून राहण्यासाठी नाविण्यपूर्ण व्यवसायिक उपक्रम हाती घेवून ब्रॅडीग, पॅकेजिंग व मार्केटिंगचे तंत्राबद्दल माहिती दिली.
प्रारंभी राज्य सहकारी संघाचे अध्यक्ष ॲड. तिडके आणि मुख्य कार्यकारी अधिकारी उत्तम इंदलकर यांनी स्वागत केले. आभार प्राचार्य शरद इंगोले यांनी केले.