Published On : Wed, Sep 20th, 2017

भाजपाचा विकास व व्हिजन हे फोटोशॉप पुरतेचः डॉ. राजू वाघमारे

Advertisement

नांदेड: भाजपा सरकारचा कथित विकास आणि व्हिजन केवळ फोटोशॉपवर अवलंबून असून जो पर्यंत एखादी गोष्ट फोटोशॉपमध्ये तयार होत नाही, तो पर्यत त्यांचा विकास जनतेला दाखवता येत नाही, असा उपरोधिक टोला प्रदेश काँग्रेसच्या अनुसुचीत जाती विभागाचे अध्यक्ष व प्रवक्ते डॉ. राजू वाघमारे यांनी नांदेड येथील आयोजित पत्रकार परिषदेत भाजप सरकारला लगावला.

पुढे बोलताना ते म्हणाले की, कै. डॉ. शंकरराव चव्हाण साहेबांप्रमाणेच दूरदृष्टी असलेले प्रगल्भ नेतृत्व आणि कार्यक्षमता असलेल्या अशोकराव चव्हाणांमुळेच नांदेडचा कायापालट झालेला आहे. त्यांनी शहरात चांगले रस्ते, उद्याने, स्टेडियम, खेळाची मैदाने, शिक्षणसंस्था उभ्या केल्या. विकासाबरोबरच सामाजिक सलोखा व सहिष्णूता जपण्याचे काम खा. अशोकराव चव्हाण यांनी केले. उलट केंद्रात आणि राज्यात सत्तेत आल्यापासून भाजप सरकारने फक्त द्वेषाचे राजकारण सुरु केले आहे. दुसऱ्या पक्षाचे खच्चीकरण करण्यासाठी विरोधकांच्या ताब्यात असलेल्या शहरांचा विकास थांबवण्याचे पाप सरकार करत आहे.

Gold Rate
23 July 2025
Gold 24 KT 1,00,900 /-
Gold 22 KT 93,800 /-
Silver/Kg 1,16,700/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

भाजप सरकारला विकासाची दूरदृष्टी नाही. निवडणूकीत मतांसाठी वाट्टेल ते खोटे बोलायचे, जनतेची दिशाभूल करुन मते मिळवायची आणि निवडून यायचे ही भाजपची कार्यपध्दती आहे. कल्याण डोंबिवली मनपा निवडणूकीच्या प्रचारसभेत शहरासाठी साडे सहा हजार कोटींच्या पॅकेजची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली होती. या घोषणेचे काय झाले? साडे सहा हजार कोटी कुठे आहेत ? असा सवाल डॉ. राजू वाघमारे यांनी केला.

पुढे ते म्हणाले भाजप सरकारने इंदू मिलच्या भूमी पुजनाचा कार्यक्रम घेऊन दोन वर्ष उलटली परंतु अद्याप काम सुरू झालेले नाही. भाजपाने खोटे आश्वासन देऊन इंदू मिलवरील प्रस्तावित स्मारकाचा मुद्दा रेंगाळत ठेवलेला आहे. त्यांना ते काम करायचेच नाही. भाजपाचा डोळा फक्त दलितांच्या मतांवरच आहे. अशा प्रकारचे वर्तन करून भारतीय जनता पक्षाने आंबेडकरी समाजाशी खोटे बोलून त्यांच्या भावनेची प्रतारणा केलेली आहे. सहा डिसेंबर पूर्वी इंदू मिल येथील प्रस्तावित स्मारकाचे काम सुरु केले नाही तर काँग्रेस पक्ष राज्यभर तीव्र आंदोलन करेल असा इशारा डॉ. राजू वाघमारे यांनी दिला.

Advertisement
Advertisement