· विदर्भातील पर्यटन उद्योगाला चालना देण्याची गरज
· विदर्भ उद्योग गौरव पुरस्कार-२०१७ चे विदर्भातील ७ उद्योजक मानकरी
नागपूर: विदर्भातील उद्योग क्षेत्रातील बलस्थाने व कमतरता ओळखून नवीन तंत्रज्ञान व उद्यमाशिलतेच्या नव्या प्रयत्नांनी येथील उद्योग क्षेत्र विकसित केले जाऊ शकते . यासाठी प्रबळ इच्छाशक्ती, तंत्रज्ञान व राजकीय दृष्टीकोन आवश्यक आहे , असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते परिवहन, महामार्ग, जलसंसाधन व नदी विकास मंत्री नितीन गडकरी यांनी आज नागपूर येथे केले. स्थानिक हॉटेल सेंटर पॉंईट, रामदासपेठ येथे आयोजित विदर्भ इंड्रस्ट्रिज असोसिएशन ( व्हि.आय.ए.) च्या 54 व्या वर्धापन दिनाप्रसंगी विदर्भ उद्योग गौरव पुरस्कार 2017 चे वितरण आज त्यांच्या हस्ते करण्यात आले., त्यावेळी ते बोलत होते.यावेळी व्ही.आय.ए. चे अध्यक्ष अतुल पांडे , सोलर ग्रुपचे अध्यक्ष सत्यनारायण नुवाल,राज्यसभा खासदार अजय संचेती प्रामुख्याने उपस्थित होते.
विदर्भातील उद्योगाला चालना देण्यासाठी केंद्र व राज्य शासन तत्पर आहे. स्टारलाईट कंपनीचा बुटीबोरी औद्योगिक क्षेत्रात सुमारे 18 हजार कोटीचा इलेक्ट्रॉनिक्सचा प्रकल्प, प्रस्तावित असून बिस्बेन या गुजरात येथील कापूस निर्यात कंपनीतर्फे वर्धा जिल्हयात 50 हजार एकरावर सेंद्रीय कापसाची लागवड केली जाणार आहे . अमरावतीच्या टेक्सटाइल पार्कमध्ये असलेल्या 15 ते 16 युनिटस् मधून सुमारे ३ हजार युवकांना रोजगार मिळाला आहे. एच.सी.एल. कंपनीतर्फे नागपूरात 4,000 युवकांना प्रशिक्षण देवून रोजगार मिळणार असून त्यांच्या प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटनही लवकरच होईल, अशी माहिती गडकरी यांनी यावेळी दिली.
विदर्भातील पर्यटन क्षेत्राला चालना देण्याची गरज आहे. कोळशापासून मिथेनॉल, तांदळाच्या धानापासून व बायोमासपासून सेकंड जनरेशन इॅथेनॉल इत्यादी पर्यायी इंधनाचा वापर परिवहन क्षेत्रात मोठया प्रमाणात होणे गरजेचे आहे, असेही त्यांनी सांगितले.
विदर्भातील 7 उद्योजकांना विविध श्रेणीमध्ये विदर्भ उद्योग गौरव पुरस्कार-२०१७ चे वितरण गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले. ‘मिडीयम स्केल इंडस्ट्री ‘या श्रेणीत एम.एम.पी. इंडस्ट्रिज (अरूण भंडारी, व्यवस्थापकीय संचालक), ‘स्माल स्केल इंडस्ट्री’ या क्षेत्रात राईट सोल्यूशन्स प्रा.लि., ‘विभागातील उत्कृष्ठ निर्यातदार’ या श्रेणीत सुर्यलक्ष्मी कॉटनमिल प्रा.लि. (पारितोष अग्रवाल, व्यवस्थापकीय संचालक),
‘या वर्षातील महिला उद्योजक’ या श्रेणीत स्पेशल बायोकेम लिमिटेड (निशा सोनारे, व्यवस्थापकीय संचालक), ‘ विकसनशील जिल्ह्यातील सर्वात आश्वासक उद्योग’ याकरिता गडचिरोली जिल्ह्यातील शांतीराज फूड प्रा.लि. (अमोल चकलनवार), ‘बेस्ट स्टार्ट अप ऑफ रिजन’ या श्रेणीत टी-सेकंड टेक्नोलॉजी ( साहिल चावला) व बेस्ट सर्वीस प्रोव्हायडर ऑफ रिजन’ या श्रेणीत लॉजिस्टिक पार्क प्रा.लि.(विरेन ठक्कर. मुख्य कार्यकारी अधिकारी) या उद्योजकांना गडकरी यांच्या हस्ते मानपत्र, स्मृतीचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन गौरवण्यात आले.
व्हि.आय.ए. चे वतीने दिना जाणारा जीवनगौरव पुरस्कार नागपूर येथील हल्दिराम समूहाचे प्रमुख जयकीशनजी अग्रवाल यांना जाहीर झाला. हा पुरस्कार त्यांचे पुत्र कमल अग्रवाल यांनी तो मान्यवरांच्या हस्ते स्वीकारला.
या कार्यक्रमास व्हि.आय.ए. चे पदाधिकारी, शहरातील लोकप्रतिनिधी , महापौर नंदा जिचकार , पोलिस आयुक्त व्यंकटेशम व विदर्भातील उद्योजक उपस्थित होते.