
दक्षिण मुंबई आणि उपनगरामध्ये पावसाचा जोर प्रचंड आहे. त्यात वारा सुटल्याने मुंबईकरांची दैना झाली. बोरीवली, गोरेगाव, अंधेरी, विलेपार्ले, बीकेसी, माहीम, दादर, वरळी, महालक्ष्मी, गिरगाव, मरिन ड्राइव्ह, कुलाबा, भायखळा, लालबाग, परळ, सायन, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी आणि मुलुंड येथे पावसाने धुमाकूळ घातला. दादरच्या हिंदमाता येथे पाणी साचल्याने वाहतुकीचा प्रचंड खोळंबा झाला आहे. त्यामुळे ठिकठिकाणी वाहतूककोंडी झाली आहे. पावसामुळे भायखळा, लालबाग, परळ,माटुंगा आणि सायन येथे वाहतुकीचा वेग मंदावला. सांताक्रुझ-चेंबूर लिंक रोड, पूर्व उपनगरात लाल बहादूर शास्त्री मार्गावर कुर्ला डेपो, शीतल सिनेमागृह, कमानी आणि घाटकोपर येथील श्रेयस टॉकीज येथील वाहतुकीचा वेग मंदावल्याने वाहतूक कोंडीत वाढ झाली आहे. अनेक ठिकाणी पाणी साचल्याने त्या परिसरातील वाहतूक इतरत्र वळविण्यात आली आहे.
मुसळधार पावसाचा विमान सेवेवरही प्रचंड परिणाम झाला आहे. खराब हवामानामुळे विमानांची उड्डाणंही उशिराने होतं आहेत. येत्या 24 तासात मुंबईसह कोकण किनारपट्टी, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात जोरदार पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर मराठवाड्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल, असा अंदाज आहे.
समुद्राला भरती असल्यानेसतर्कतेचा इशारा
आज दुपारी 4 वाजून 35 मिनिटांनी समुद्राला भरती येणार आहे. समुद्रात 3.32 मीटर उंचीच्या लाटा उसळणार आहेत. त्यातच मुसळधार पाऊस सुरू असल्याने वेधशाळेने सतर्कतेचा इशारा दिला आहे. मच्छिमारांनाही समुद्रात न जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे.









