Published On : Mon, May 8th, 2017

मुंबई: सहा दिवसांत लोकल रेल्वेच्या अपघातात 61 जणांचा मृत्यू

Advertisement
Mumbai Local

Representational Pic


मुंबई:
मुंबईकरांची लाइफलाइन समजली जाणारी लोकल रेल्वे धोकादायक ठरत असल्याचं समोर येत आहे. मध्य, हार्बर आणि पश्चिम अशा तीन मार्गांवर दररोज सरासरी दहा प्रवाशांचा बळी जात असतो. लोकल मार्गावर रेल्वे रूळ ओलांडणं धोकादायक असलं तरीही अनेक प्रवासी याच शॉर्टकटचा वापर करतात आणि त्यामुळेच अपघातांच्या संख्येत वाढ होते. मुंबईमध्ये गेल्या सहा दिवसांत रेल्वे अपघातात 61 जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

गेल्या काही दिवसांतील अपघातांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. सर्वाधिक अपघात असून 1 ते 6 मे या दरम्यान झाले असून यामध्ये 61 प्रवाशांचा रेल्वे अपघातात मृत्यू झाला आहे. तर शनिवारी म्हणजेच 6 मे रोजी 15 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. यातील 13 पुरुष तर दोन स्त्रिया आहेत. तसेच 11 जण जखमी झाले आहेत.

मध्य, पश्चिम, हार्बर, ट्रान्सहार्बर मार्गांवर दररोजच्या प्रवासात रेल्वे रूळ ओलांडणे, चालत्या लोकलमध्ये दारात लटकल्याने खांबांचा धक्का लागणे आदींमुळे सर्वाधिक अपघात होतात. शनिवारी तब्बल 15 रेल्वे प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला. त्यापैकी कुर्ला स्थानकातच 5 जणांचा मृत्यू झाला तर कल्याणजवळ झालेल्या अपघातात 3 जणांचा मृत्यू झाला. इतर रेल्वे स्थानकांच्या हद्दीत 7 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे.

यापूर्वी म्हणजेच 24 जानेवारी रोजी 16 जणांचा तर 2 फेब्रुवारी रोजी 14 जणांचा एकाच दिवशी विविध लोकल अपघातांमध्ये मृत्यू झाला होता. रेल्वे रुळ ओलांडु नका, प्रवाशांनी लोकलनं प्रवास करताना काळजी घ्यावी असं आवाहन रेल्वेकडून नेहमी करण्यात येतं मात्र, तरिही प्रवासी रेल्वे रुळ ओलांडतात आणि त्यामुळे अपघात होतात.

1 मे ते 6 मे दरम्यान झालेले अपघात आणि मृतकांची संख्या

1 मे – 10 जणांचा मृत्यू
2 मे – 12 जणांचा मृत्यू
3 मे – 9 जणांचा मृत्यू
4 मे – 12 जणांचा मृत्यू
5 मे – 3 जणांचा मृत्यू
6 मे – 15 जणांचा मृत्यू