
नागपूर : शहरातील कलेक्टर कार्यालयात लाचखोरीचा गंभीर प्रकार उघडकीस आला असून, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) मोठी कारवाई करत महसूल सहाय्यकाला रंगेहात पकडले आहे. आरोपीचे नाव नरेश साधुरावजी बारवे (वय ५४) असे असून तो कलेक्टर कार्यालयात महसूल सहाय्यक म्हणून कार्यरत होता.
प्राथमिक माहितीनुसार, बांधकामाशी संबंधित एका अपील प्रकरणाचा निकाल लावण्यासाठी बारवे याने तब्बल ५ लाख रुपयांची मागणी केल्याचा आरोप आहे. तक्रारदाराने याबाबत एसीबीकडे धाव घेतल्यानंतर सापळा रचण्यात आला.
शनिवारी सापळा कारवाईदरम्यान आरोपीला लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले. या घटनेमुळे कलेक्टर कार्यालयातील कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
दरम्यान, या प्रकरणात इतर कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास सुरू असून संबंधितांविरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.








