नागपूर : श्रीवत्स ज्योतिष विद्यालय आणि जंगोराईताड आदिवासी विकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने ‘सुरोत्सव – म्युझिक फॉर अ कॉज’ हा विशेष संगीत कार्यक्रम रविवार, 26 एप्रिल रोजी सायंकाळी 6.30 वाजता धरमपेठ येथील वनामती परिसरातील वसंतराव नाईक सभागृहात आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमात नागपुरातील युवा गायक अथर्व रोहित डाके हिंदी आणि मराठी गाण्यांची रंगतदार मैफल सादर करणार आहे. त्याला गायिका सुरभी ढोमणे यांची साथ लाभणार असून, तबल्यावर सचिन ढोमणे साथसंगत करणार आहेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विघ्नेश जोशी करणार आहेत.
अथर्व डाके हा शहरातील एक होतकरू गायक असून त्याच्या आवाजात शास्त्रीय संगीताची भक्कम पायाभरणी जाणवते. त्याच्या सादरीकरणातून सुर, ताल आणि लय यांचा संगम रसिकांना अनुभवायला मिळणार आहे. विशेष म्हणजे, त्याला प्रख्यात गायक शंकर महादेवन यांचे मार्गदर्शन लाभले आहे.
‘सुरोत्सव’ हा केवळ मनोरंजनासाठी नसून सामाजिक उद्देश डोळ्यासमोर ठेवून आयोजित करण्यात आलेला उपक्रम आहे. ‘वात्सल्यम’ प्रकल्पासाठी निधी उभारणी आणि जनजागृती हा या कार्यक्रमाचा हेतू आहे. या उपक्रमाअंतर्गत गर्भवती महिलांना मोफत वैद्यकीय सेवा, पोषण आहार, समुपदेशन तसेच बाळंतिणी व नवजात बालकांची देखभाल केली जाते.
जंगोराईताड आदिवासी विकास संस्था गेल्या दशकभरापासून सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात विविध उपक्रम राबवत आहे. विविध कार्यक्रम, प्रकाशन आणि उद्योग प्रोत्साहनाच्या माध्यमातून संस्था समाजाशी जोडलेली आहे.
हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य असून नागपूरकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या सुरेल मैफलीचा आनंद घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. कार्यक्रमाला शहरातील विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
पत्रकार परिषदेत डॉ. मदन कापरे, दीपक त्रिवेदी, मंदार वेखंडे, फाल्गुनी नलगे, अथर्व डाके, रोहित डाके, मुकुंद ऊईके, किरण वेरूळकर आणि नितीन वर्मा उपस्थित होते.









