
नागपूर :शहरात पाणीपुरवठा करणाऱ्या ओसीडब्ल्यूकडून अनेक ग्राहकांना अवास्तव आणि वाढीव पाणी बिले प्राप्त झाल्याच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. नागरिकांना भेडसावणाऱ्या तक्रारींच्या निराकरणासाठी मनपाच्या जलप्रदाय विभागाद्वारे ऑरेंज सिटी वॉटर यांच्या सहकार्याने आयोजित दोन दिवसीय तक्रार निवारण शिबिराच्या पहिल्या दिवशी नागरिकांनी उत्तम प्रतिसाद दिला. शिबिरात पहिल्या दिवशी एकूण ५५९ तक्रारींचे निराकरण करण्यात आले.
मा.महापौर श्रीमती निता ठाकरे यांच्या निर्देशानुसार, स्थायी समिती सभपती श्रीमती शिवानी दाणी वखरे, सत्ता पक्ष नेता श्री नरेंद्र(बाल्या) बोरकर, जलप्रदाय विशेष समिती सभापती श्रीमती दिव्या धुरडे यांच्या देखरेखीत व आयुक्त डॉ. विपीन यांच्या मार्गदर्शनात अधीक्षक अभियंता डॉ. श्वेता बॅनर्जी, कार्यकारी अभियंता श्री. श्रीकांत वाईकर यांच्याद्वारे हे शिबीर आयोजित करण्यात आले असून, पहिल्या टप्प्यात मनपाच्या लक्ष्मीनगर झोन, हनुमान नगर झोन, गांधीबाग झोन, सतरंजीपूरा झोन, आशीनगर झोन कार्यालयात २० व २१ एप्रिल रोजी हे शिबीर आयोजित केले जात आहेत. पहिल्या दिवशी लक्ष्मीनगर झोनमध्ये २९, हनुमाननगर झोन मध्ये ३, गांधीनगर झोन मध्ये ७७, सतरंजीपुरा झोन मध्ये १५५ तर आशीनगर झोनमध्ये २९५ अशा एकूण ५५९ तक्रारी प्राप्त झाल्या व त्यांचे त्वरित निराकरण करण्यात आले.
पाच झोन मध्ये उद्यापासून शिबीर
मनपाच्या धरमपेठ झोन, धंतोली झोन, नेहरू नगर झोन, लकडगंज झोन व मंगळवारी झोन कार्यालयात २२ व २३ एप्रिल रोजी सकाळी १०.३० ते ५.०० वाजेदरम्यान आयोजित केले जाणार आहेत.








